
झारखंड येथे पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगल परिसरात सुरक्षा दल आणि माओवादी नक्षल्यामध्ये गुरुवारी मोठी चकमक उडाली. या कारवाईत एक कोटी रुपयांचे इनाम नावावर असलेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) वरिष्ठ लीडरसह इतर नऊ जण ठार झाले आहेत. छोटानागरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभडीह गावाच्या नजीक ही चकमक सुरु असून अजूनही कारवाई सुरु असल्याचे म्हटले जात आहे. प्रथमदर्शनी या कारवाईत एकूण १५ माओवादी ठार झाल्याचा संशय आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम अजूनही सुरु असल्याने मृतांची नेमकी संख्या अजून कळालेली नाही.
या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतांची संख्या मोजण्याचे काम अजूनही सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनी पहाटेपासून सतत गोळीबाराचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. जंगलाच्या दुर्गम भागातून जोरदार गोळीबाराचा आवाज येत होता. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षल्यांचे उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी ही मोठी चकमक झडली आहे.सुरक्षा दल घनदाट सारंडा जंगलात माओवादविरोधी शोध मोहीम राबवत असताना, दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी अचानक सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याने मोठी चकमक उडाली आहे.
या कारवाईची आणि अनल दा उर्फ तुफान या माओवादी लीडरच्या मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आयजी (ऑपरेशन्स) मायकल राज यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारावर ही कारवाई सकाळी ६.३० च्या सुमारास सुरू झाली. “सध्या आम्ही संपूर्ण तपशील उघड करणार नाही. आम्ही ठार झालेल्या माओवाद्यांच्या संख्येची नेमका आकडा सांगू शकत नाही. परंतू, अनल दा सोबत आणखी आठ ते नऊ जण ठार झाले आहेत असेही मायकल राज यांनी स्पष्ट केले.
झारखंडच्या तीन सर्वाधिक मोस्ट वॉन्टेड माओवादी नेत्यांपैकी एक हा अनल दा उर्फ पती राम मांझी या चकमकीत ठार झाला आहे. तो केंद्रीय समितीचा सदस्य होता आणि सारंडा परिसरात सक्रिय होता. मात्र,यावेळी अधिकाऱ्यांनी इतर दोघांच्या मृत्यूबद्दल अद्याप दुजोरा दिलेला नाही; मिसिर बेसरा, जो पॉलिटब्युरो सदस्य आणि पूर्व प्रादेशिक ब्युरोचा सचिव आहे आणि एकदा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता, आणि असीम मंडल, उर्फ आकाश मंडल, जो मूळचा पश्चिम बंगालचा आहे.