CM Hemant Soren: झारखंडमध्ये ईडीच्या छाप्यात सापडल्या 2 एके 47; मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर धडक कारवाई; बिहारमध्येही छापेमारी सुरुच

बिहारमध्ये सीबीआय आणि झारखंडमध्ये ईडीकडून जोरदार कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून राज्यातील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. प्रेम प्रकाश यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले असून, त्यात दोन एके 47 रायफलही सापडल्या असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

CM Hemant Soren: झारखंडमध्ये ईडीच्या छाप्यात सापडल्या 2 एके 47; मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर धडक कारवाई; बिहारमध्येही छापेमारी सुरुच
| Updated on: Aug 24, 2022 | 1:53 PM

मुंबईः अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) झारखंडमधील अवैध खाणकामातील मनी लाँड्रिंगप्रकरणी 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand Chief Minister Hemant Sorenयांचे निकटवर्ती म्हणून समजले जाणारे प्रेमप्रकाश यांच्या घरावर आणि त्यांच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. ईडीकडून ज्यावेळी छापा टाकण्यात आला त्यावेळी 2 एके 47 रायफल (2 AK 47 rifles) सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज सीबीआयकडून बिहारमधील आरजेडी नेत्यांच्या संबंधित घरांवर आणि त्यांच्या इतर ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील केंद्र सरकारविरोधात असणाऱ्या राज्यात ईडी सक्रिय झाल्याची टीका केली जात आहे.

झारखंडमध्ये अवैध खाणकामात मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून झारखंडमधील 17 ते 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

ईडीकडून छापेमारीचे सत्र सुरुच

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी म्हणून पंकज मिश्रा आणि बच्चू यादव यांची चौकशी केल्यानंतर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या दोघांनाही ईडीने अटक करुन ताब्या घेतले आहे. ईडीने मार्चमध्ये मिश्रा आणि इतरांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून छापा टाकण्यात आला होता.

बिहारमधील 24 ठिकाणी छापे

केंद्रीय तपास यंत्रणेकडून बिहारमधील 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयने नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरजेडीचे वरिष्ठांवर कारवाई

तर सीबीआयकडून ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत, त्यामध्ये आरजेडी आमदार सुनील सिंग, सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांचाही यामध्ये समावेश असल्याचे अधिकाऱ्यांकडून सागंण्यात आले.

फ्लोअर टेस्टपूर्वीच सीबीआयचे छापे

बिहारच्या विधानसभेची फ्लोअर टेस्ट होण्यापूर्वी सभापतींनी राजीनामा दिला होता, या अशा राजकीय परिस्थितीतच बिहारमधील आरजेडी नेत्यांवर सीबीआयचे छापे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हे केंद्रातील सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत असून सुडाचे राजकारण करत असल्याची टीकाही आरजेडी नेत्यांकडून करण्यात येत आहे.