‘द केरला स्टोरी’ फक्त एका राज्यातली गोष्ट नव्हे तर…; कर्नाटकच्या निवडणूक प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांच्याकडून भाष्य

The Kerala Story : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘द केरला स्टोरी’चा उल्लेख; कर्नाटकच्या निवडणूक प्रचारसभेत म्हणाले...

‘द केरला स्टोरी’ फक्त एका राज्यातली गोष्ट नव्हे तर...; कर्नाटकच्या निवडणूक प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांच्याकडून भाष्य
| Updated on: May 05, 2023 | 4:31 PM

बंगळुरू : कर्नाटकात सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात निवडणूक प्रचारासाठी सभा घेत आहेत. कर्नाटकातील बल्लारी इथं त्यांनी सभेला संबोधित केलं. ‘जय बजरंग बली’ म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. या प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील विकास कामं आणि आगामी योजनांवर भाष्य केलं. तसंच काँग्रेसवरही सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ‘द केरला स्टोरी’चा सिनेमाही उल्लेख केला आहे.

‘द केरला स्टोरी’ या सिनेमाची मागच्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा होतेय. यावर कर्नाटकात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

‘द केरला स्टोरी’ ही केवळ केरळमधील आतंकवादी कारवायांवरचा चित्रपट आहे. पण ही केवळ एका राज्याची गोष्ट नाही. केरळमध्ये दहशतवादी कारस्थान कसं रचलं जातं? हे यात सांगण्यात आलं आहे. पण तसं तर केरळची ओळख मेहनती, हुशार आणि बुद्धीमान लोकांचं राज्य अशी आहे. पण या सिनेमातून दहशतवादी कारस्थानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

समाजाला बॉम्ब-बंदुक आणि पिस्तुलाचा आवाज ऐकू येतो. दहशतवादी कारस्थानाचा आवाज ऐकू येत नाही. त्यामुळेच न्यायालयानेही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. अशातच दहशतवादी कारस्थानावर ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा बनवण्यात आला आहे. त्याची बरीच चर्चा होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

‘द केरला स्टोरी’ सिनेमाविषयी

‘द केरला स्टोरी’ सिनेमा केरळमधील धर्मांतरावर आधारित आहे. केरळमधील सुमारे 32 हजार महिलांचं बळजबरीने धर्मांतर करण्यात आलं. त्यांना इस्लाम धर्म स्विकारायला लावण्यात आलं. अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं, यावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमा सत्य घटनांवर आधारित असल्यााचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. कर्नाटकातील स्थानिक प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. तर काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.