Nitin Gadkari : एक्सप्रेस वे वर कारचा स्पीड होता 120 किमी..तितक्यात नितीन गडकरींच्या ताफ्यासमोर अचानक आले 3 जण, मग..
Nitin Gadkari : एकदा एक्सप्रेस वे पूर्णपणे चालू झाला की, दिल्ली-मुंबई अंतर केवळ 12 तासात गाठता येईल. सध्या 24 तास लागतात. या एक्सप्रेस वे वर ताशी 120 किमी वेगाने गाडी पळवता येईल.

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे चा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी गडकरींच्या सुरक्षेत एक मोठी चूक झाली. गडकरी यांच्या वाहनांचा ताफा रतलाम जिल्ह्यातून जात होता. त्यावेळी 8 व्या लेनवर काही ग्रामस्थ अचानक त्यांच्या ताफ्यासमोर आलें. त्यावेळी गाडीचा स्पीड ताशी 120 किलोमीटर होता. सुदैवाने यावेळी मोठा अपघात टळला. रस्त्याच्या मध्यभागी गडकरी यांच्या वाहन ताफ्यासमोर अचानक काही लोक आले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने पोलीस आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. वाहन ताफ्यासमोर आलेले लोक रतलाम जिल्ह्यातील शिवगढ क्षेत्रातील निवासी आहेत. ते 8 व्या लेनच्या आसपास राहतात. एक्सप्रेस वे मुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. शेतात पाणी जमा होतं तसचं अन्य काही प्रश्नांबद्दल त्यांना केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेटायचं होतं. काही ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आधीच उपस्थित होते.
व्हिडिओमध्ये दिसणारे तीन लोक गडकरींचा वाहन ताफा जात असताना अचानक 8 व्या लेनच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. आसपास अजून बरेच लोक होते. पण ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीयत. ताफ्यातील ड्रायव्हरकडून छोटीशी चूक झाली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. स्थानिक नागिरकांच्या मनात एक्सप्रेस वे च्या अधिकाऱ्यांबद्दल संताप आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या मध्य प्रदेशमधून जाणाऱ्या 245 किमीच्या पट्ट्याचा आढावा घेतला. 1350 किलोमीटर लांबीच्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे चा 245 किमीचा पट्टा मध्य प्रदेशच्या मंदसौर, रतलाम आणि झाबुआ जिल्ह्यातून जातो.
एक्सप्रेस वे मुळे मुंबई वरुन दिल्लीला किती तासात पोहोचता येईल
“मध्य प्रदेशमधून जाणाऱ्या एक्सप्रेस वे च्या सर्व नऊ पॅकेजचं काम पूर्ण झालं आहे. निरीक्षणादरम्यान नितीन गडकरी यांनी प्रत्येक बाबीची व्यक्तिगत समीक्षा केली. प्रत्यक्ष तिथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली” असं NHAI चे क्षेत्रीय अधिकारी एनएल येओतकर यांनी सांगितलं. हा एक्सप्रेस वे आठ लेनचा असून तिथल्या सुविधांवर गडकरी यांनी समाधान व्यक्त केलं. रस्ते सुरक्षा, देखभाल आणि अन्य निकषांचं कठोरतेने पालन करण्याच्या सूचनाही दिल्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एकदा एक्सप्रेस वे पूर्णपणे चालू झाला की, दिल्ली-मुंबई अंतर केवळ 12 तासात गाठता येईल. सध्या 24 तास लागतात. या एक्सप्रेस वे वर ताशी 120 किमी वेगाने गाडी पळवता येईल.