
मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. संशयाच्या आधारावर यासंदर्भातील खटल्यातून माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष सुटका झाली. त्यांनी शनिवारी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतरांची नावे घेण्यासाठी आपल्याला यंत्रणांनी खूप छळल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे आपण याविषयीचा जबाब दिलेला असतानाही NIA च्या विशेष न्यायालयाने जो निकाल दिला. त्यात आपल्या या गंभीर आरोपाचा साधा उल्लेख ही नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी औपचारिक चर्चा केली. त्या दरम्यान त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण आणि त्यासंदर्भात त्यांचा करण्यात आलेला छळ याविषयी माहिती दिली. विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी त्यांच्या निवाड्यात साध्वींचा अन्वनीत छळ आणि त्यांच्याशी गैरप्रकार झाल्याच्या दावे खारीज केले आहेत, हे विशेष.
मोदी आणि योगींचे नाव घ्या
साध्वीने सांगितले की, मालेगाव बॉम्बस्फोटात मोदी आणि योगी यांना गोवण्याचा प्लॅन होता. त्यासाठी तपास अधिकारी आपल्यावर दबाव टाकत होते. त्यावेळी आपण गुजरातमधील सूरत येथे वास्तव्यास होतो. अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव घेण्यासाठी पण दबाव टाकल्याचा खळबळजनक दावा साध्वी यांनी केला. पण आपण कोणाचेच नाव घेतले नाही. कोर्टात सुनावणीवेळी आपण या गोष्टी मांडल्या. आपण याविषयीचा लिखीत दावा सुद्धा सुनावणीवेळी सादर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
छळाचा नाही कोणताही पुरावा
न्यायाधीश लाहोटी यांनी या खटल्याच्या निकालपत्रात साध्वी यांच्या छळाच्या कहाणीचा पूर्णपणे इन्कार करण्यात आला आहे. साध्वी यांच्या छळ आणि गैरवर्तनाचे कोणतेही पुरावे माझ्या निदर्शनास आणलेले नाहीत आणि म्हणूनच आपण त्यांचा याविषयीचा दावा स्वीकारण्यास तयार नाही, असे लाहोटी यांनी निरीक्षण नोंदवले आहे.
आपल्याविरुद्धचा संपूर्ण खटला निराधार आहे.महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे दुष्ट व्यक्ती आहेत. परमबीर सिंग, (तत्कालीन एटीएस प्रमुख) हेमंत करकरे आणि सुखविंदर सिंग यांनी आपला छळ केला आणि खोटं बोलण्यासाठी दबाव टाकला असा आरोप साध्वींनी केला.