भारतात बनलेल्या चिप्स लवकरच बाजारात येणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून साणंद सेमीकंडक्टर प्लांटचे कौतुक

गुजरातच्या साणंदमधील औद्योगित परिसरात सेमीकंडक्टर प्लांटचे काम वेगाने सुरु आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्री डॉ. अश्विनी वैष्णव यांनी या विशाल प्लांटच्या बांधकामाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भारतात बनलेल्या चिप्स लवकरच बाजारात येणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून साणंद सेमीकंडक्टर प्लांटचे कौतुक
Ashwini Vaishnaw and SemiConductor plant
| Updated on: Aug 28, 2025 | 7:51 PM

अमेरिकेच्या मायक्रोन कंपनीकडून गुजरातमधील साणंदमध्ये एका मोठ्या सेमीकंडक्टर प्लांटचे काम वेगाने सुरु आहे. हा प्लांट जगातील सर्वात मोठ्या बॅकएंड सेमीकंडक्टर फॅब युनिटपैकी एक असणार आहे. सध्या हे भारतातील सर्वात मोठे फॅब युनिट आहे. अशातच आता केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्री डॉ. अश्विनी वैष्णव यांनी या विशाल प्लांटच्या बांधकामाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरून हा प्लांट किती मोठा आहे याची कल्पना येते.

गुजरातच्या साणंदमध्ये प्लांट

गुजरातच्या साणंदमधील औद्योगित परिसरात असलेल्या या प्लांटच्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झाल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे, त्यानंतर लगेच सेमीकंडक्टर चिप निर्मितीचे काम सुरू होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

डिसेंबरपर्यंत उत्पादन सुरु होण्याची शक्यता

मायक्रोन ही अमेरिकन कंपनी जगातील एक आघाडीची चिप उत्पादक कंपनी आहे. मायक्रोन दोन टप्प्यात भारतात प्लांट उभारत आहे. कंपनी या दोन्ही टप्प्यासाठी 825 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. तसेत सरकारी अनुदानासह सेमीकंडक्टर प्लांटमध्ये एकूण 2.75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची आहे. याआधी मायक्रोनने डिसेंबर 2024 पर्यंत या युनिटचा पहिला टप्प्याचे काम पूर्ण करून चिपचे उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र काही कारणामुळे विलंब झाला आहे. आता या वर्षाच्या अखेरीस चिप उत्पादनाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे.

क्लीन रूमचे व्हॅलिडेशन पूर्ण

क्लीन रूमच्या व्हॅलिडेशनचे काम आधीच पूर्ण झालेले, त्यामुळे चिप उत्पादनाचे काम कधीही सुरू होऊ शकते. सेमीकंडक्टर युनिटमध्ये क्लीन रूम खूप महत्वाची असते. कारण चिप बनवताना 100% स्वच्छता गरजेची असते. धूळीचे कण किंवा रसायने चिप उत्पादनावर परिणाम करू शकतात यामुळे चिप्स खराब होतात. त्यामुळे क्लीन रूमचे बांधकाम अतिशय काळजीपूर्वक करण्यात आले आहे. दरम्यान टाटा प्रोजेक्ट्स कंपनीने मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या या युनिटचे बांधकाम केले आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले?

या प्लांटच्या बांधकामाबाबत बोलताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लवकरच या प्लांटमध्ये तयार झालेली चिप पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला समर्पित करणार आहेत. भारतात सेमीकंडक्टर तयार व्हावे हे एक स्वप्न होते, ते आता पूर्ण होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दूरदृष्टी आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले.