Modi Cabinet Reshuffle : अखेर ठरलं? मोदी कॅबिनेटचा याच महिन्यात विस्तार? बड्या नेत्याला मिळणार मंत्रिपद; रेसमध्ये कुणाचे नाव?

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार 23 नोव्हेंबर रोजी होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनुसार, पश्चिम बंगालमधील मोठ्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यात शमिक भट्टाचार्य यांचे नाव आघाडीवर आहे. महाराष्ट्रासह बिहार आणि उत्तर प्रदेशालाही मंत्रिपदे मिळण्याची अपेक्षा आहे. दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.

Modi Cabinet Reshuffle : अखेर ठरलं? मोदी कॅबिनेटचा याच महिन्यात विस्तार? बड्या नेत्याला मिळणार मंत्रिपद; रेसमध्ये कुणाचे नाव?
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 12:33 PM

Modi Cabinet Reshuffle : गेल्या काही महिन्यांपासून मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. एवढेच नव्हे तर मोदींच्या मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाला संधी मिळणार याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, दरवेळी विस्ताराची चर्चा ही केवळ चर्चाच ठरताना दिसत आहे. परंतु, यावेळी एक खात्रीलायक बातमी समोर आली आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मोदी सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात बड्या नेत्यांना संधी मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे. विस्ताराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र पुन्हा एकदा विस्ताराच्या चर्चा जोर धरू लागल्याने दिल्लीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पश्चिम बंगालच्या नेत्यांना संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुकांत मजूमदार आणि शांतनु ठाकूर यांच्यानंतर पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शमिक भट्टाचार्य यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी भाजपकडून शमिक भट्टाचार्य यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विस्तारात भट्टाचार्य यांना संधी मिळते की नवीनच नाव समोर येते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...

जोर बैठका सुरू

दिल्लीत सध्या बऱ्याच हालचाली होताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन आणि भाजपचे नेते बीएल संतोष यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. ही बैठक बराच वेळ सुरू होती. तर, गुरुवारी सुभेंदु अधिकारी यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. आज भाजपच्या कोलकाता कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या सर्व घडामोडींमुळेच मोदी कॅबिनेटच्या विस्ताराच्या चर्चांनी जोर धरला आहे.

बंगालमधून केवळ दोन मंत्री

सध्या तरी केंद्रीय कॅबिनेटमध्ये पश्चिम बंगालमधून दोन मंत्री आहेत. बालुरघाटचे लोकसभा खासदार सुकांत मजूमदार आणि बनगांव लोकसभा मतदारसंघातील खासदार शांतनु ठाकूर हे केंद्रात मंत्री आहेत. मजूमदार हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे शिक्षण आणि उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय आहे. शांतनु ठाकूरही राज्यमंत्री असून त्यांच्याकडे पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालय आहे.

महाराष्ट्राला काय?

दरम्यान, या कॅबिनेट विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्यालाही मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बिहार आणि उत्तर प्रदेशालाही मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us