भारतीय मजदूर संघाच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण, 23 तारखेला दिल्लीत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन, सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे
भारतीय मजदूर संघाला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 23 जुलै 2025 रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : भारतीय मजदूर संघाला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 23 जुलै 2025 रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम इंदिरा गांधी स्टेडियममधील के. डी. यादव कुस्ती हॉलमध्ये पार पडणार आहे. याविषयीची माहिती भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष हिरन्मय पंड्या यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
मनसुख मांडवीय हेदेखील उपस्थित राहणार
पंड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात मोहन भागवत हे प्रमुख पाहुणे तर कामगार आणि रोजगार विभागाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असतील. भारतीय मजदूर संघाची स्थापना 23 जुलै 1955 रोजी भोपाळमध्ये झाली होती.
आगामी काळात व्याख्यानमालेचे आयोजन केले जाणार
पंड्या यांनी सांगितल्यानुसार भारतीय मजदूर संघाने फक्त वेतन, भत्ता, बढती यासाठीच संघर्ष केलेला नाही. तर मजदूर संघाने वेळोवेळी अनेक सामाजिक जबाबदाऱ्याही पार पाडलेल्या आहेत. भारतीय मजदूर संघ पर्यायवरण, सामाजिक समरसता आणि स्वदेशी या तीन विषयांवर अगोदरपासूनच काम सुरू केलेले आहे. आता यानंतर भारतीय मजदूर संघाकडून कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य याविषयही लोकांत जनजागृती घडवून आणली जाईल. वर उल्लेख केलेल्या पाचही विषयांवर ऑगस्टनंतर आगामी पाच महिने जिल्हास्तरावर काम केले जाईल. भारतीय मजदूर संघाचे सदस्य तसेच समाजासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाईल. यातून व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही पंड्या यांनी सांगितले.
अनेक कार्यकर्त्यांचा होणार सन्मान
पंड्या यांनी सांगितल्यानुसार 23 जुलै रोजीच्या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (भारत) चे संचालक व्ही.व्ही. गिरी, राष्ट्रीय कामगार संस्थेचे अधिकारी, कामगार मंत्रालयाचे अधिकारी, मुख्य कामगार आयुक्तांचे अधिकारी, संसद सदस्य, इतर कामगार संघटनांचे वरिष्ठ नेते सहभागी होतील. या कार्यक्रमात भा.म. संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या गीता गोखले, (मुंबई), हंसूभाई दवे, (राजकोट), सम बलरेड्डी, (हैदराबाद), वसंत पिंपळापुरे, (नागपूर), अमरनाथ डोगरा, (दिल्ली), सरदार कर्तारसिंग राठोड, (पंजाब), हाजी अख्तर हुसेन, (बुलंदशहर, उत्तर प्रदेश), महेश पाठक, (रेल्वे दिल्ली) आणि इतर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानित केले जाईल.
सकाळी अकरा वाजता होणार कार्यक्रमाला सुरुवात
याच कार्यक्रमात साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’चा विशेष अंकदेखील प्रकाशित केला जाईल. तसेच या कार्यक्रमाला भारतीय मजदूर संघाचे राज्य अध्यक्ष, सरचिटणीस, महासंघाचे अध्यक्ष, विस्तार कार्यक्रम समितीचे सदस्य, दिल्ली आणि एनसीआरमधील तसेच देशभरातून हजारो कर्मचारी सहभागी होतील.हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता वाजता सुरू होईल.
