
पाऊस प्रत्येक कुटुंबीयांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात याचा देशाला फायदा होईल. हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवाचं अधिवेशन ठरेल, असं सांगतानाच बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलासमोर आपल्या संविधानाचा विजय होत आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पाऊस नाविन्य आणि नवसृजनाचं प्रतिक आहे. आतापर्यंत आलेल्या बातम्यानुसार देशभरात चांगला पाऊस झाला आहे. शेतीसाठी चांगला पाऊस पडत आहे. वातावरण चांगलं असल्याच्या बातम्या आहेत. पाऊस हा शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. गेल्या दहा वर्षात यावेळी तीनपट पाण्याचा साठा वाढला आहे. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी मोदींनी ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जगाने भारतीय सैन्याचं सामर्थ्य पाहिलं. देशात माओवाद आणि नक्षलवादही आता सीमित झाला आहे. बंदुकीच्या समोर आपला देश जिंकत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. जे झोन पूर्वी देशासाठी रेड झोन होते, आता तेच झोन देशासाठी ग्रीन झोन झाले आहेत. या पावसाळी अधिवेशनात देशाचे गुणगाण संपूर्ण देश ऐकेल, प्रत्येक खासदारही ऐकेल, असं मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचाही यावेळी उल्लेख केला. पूर्वी आपण जगात दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो. आता आपण जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. भारत जगातील प्रत्येक मंचावर विकासाची दस्तक देत आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची विरोधकांनी तयारी केली आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतरच ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला मध्यस्थीचा दावा आदी मुद्दे विरोधकांकडून उचलण्यात येणार आहेत. यावेळी मोदींनी सभागृहात उपस्थित राहावं, अशी विरोधकांची मागणी आहे. त्यामुळे मोदी सभागृहात उपस्थित राहून विरोधकांचं म्हणणं ऐकणार का? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 21 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. म्हणजे 21 बैठका होणार आहेत.