आठवड्यातील या वारी आणि या वेळेत तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरी होण्याची असते सर्वाधिक शक्यता, वाढतो सायबर ठगांचा धोका
तुम्हाला माहिती आहे का? की आठवड्याच्या एका विशिष्ट वारीच सर्वाधिक सायबर क्राईमचे गुन्हे होतात. याच दिवशी तुमच्या बँकेमधून पैसे चोरी होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

सायबर ठगांचा बँक अकाउंटवर डल्ला, सायबर चोरट्यांनी बँकेतून इतके पैसे लुटले, तितके पैसे लुटले, केवासी अपडेटचं कारण सांगून ओटीपी मागितला नंतर खात्यातून लाखो रुपये गायब या सारख्या अनेक बातम्या तुम्ही दिवसभरात विविध माध्यमांमधून वाचत असतात. मात्र अनेकदा हे सर्व घडत असताना, आपल्याला माहिती असताना देखील आपल्यासोबत सुद्धा स्कॅम होतोच. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे सायब ठग प्रचंड हुशार असतात, ते संधीच्या शोधातच बसलेले असतात, त्यांना आपण थोडी जरी संधी दिली तर त्यांनी आपलं बँक खातं लुटलंच म्हणून समजा, जर तुम्हालाही वाटत असेल की आपले बँकेतील पैसे चोरीला जाऊ नये, किंवा त्यावर कोणी डल्ला मारू नये, तर सतर्कता हाच सर्वात प्रभावी उपाय आहे.
आज आपण सायबर ठागांच्या काही खास ट्रिक जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्ही भविष्यात सतर्क राहाल आणि तुमच्यासोबत बँक स्कॅम होणार नाही. सायबर तज्ज्ञाच्या मते हे जे सायबर ठग आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या बँकेतून पैसे काढू शकतात. यात तुमची मोठी फसवणूक होते. सायबर ठग हे शुक्रवारीच सर्वात जास्त सक्रिय असतात, आणि शुक्रवारीच सर्वाधिक सायबर फसवणुकीचे गुन्हे घडतात, शुक्रवारी तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
शुक्रवारीच का?
याच महत्त्वाचं कारण म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवार येतो. दोन्ही दिवस बँका बंद असतात. याचा फायदा हे सायबर ठग घेतात. शुक्रवारी बँक बंद होण्याच्या आसपास म्हणजे चार ते सहा या वेळेत सर्वाधिक सायबर गुन्ह्यांचे आणि ऑनलाईन लुटीचे प्रकरण घडतात. हे सायबर गुन्हेगार तुमच्या बँकेतून पैसे काढतात, मात्र तोपर्यंत बँक बंद झालेली असते, शुक्रवारी बँक बंद झाल्यानंतर ती थेट सोमवारी उघडते. तोपर्यंत हे पैसे घेऊन फरार होण्यास या चोरट्यांना वेळ मिळतो आणि ते पकडले जात नाहीत. तुमच्यासोबत काही स्कॅम झाला आणि तुम्ही तासाभरात जर पोलिसांकडे गेलात तर तुमचे पैसे रिकव्हर होण्याची शक्यता अधिक असते., मात्र शुक्रवारी सायंकाळच्या वेळी जर स्कॅम झाला तर सोमवारची वाट पाहाण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो, तोपर्यंत हे सायबर ठग फरार झालेले असतात. त्यामुळे शुक्रवारी कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी.
