देशातील नारी शक्ती महिला-विरोधी पक्षांना कधीही माफ करणार नाही – धर्मेंद्र प्रधान

Dharmendra Pradhan : आज लोकसभेत विरोधकांच्या विरोधामुळे महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना (131वे) दुरुस्ती विधेयक 2026 पास होऊ शकले नाही. यावरून मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

देशातील नारी शक्ती महिला-विरोधी पक्षांना कधीही माफ करणार नाही - धर्मेंद्र प्रधान
Dharmendra Pradhan nari shakti
Image Credit source: Google
| Updated on: Apr 17, 2026 | 11:33 PM

लोकसभेत आज महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना (131वे) दुरुस्ती विधेयक 2026, डिलिमिटेशन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (दुरुस्ती) विधेयक 2026 यावर सभागृहात चर्चा झाली. यानंतर 131व्या संविधान दुरुस्तीवर चर्चेनंतर विधेयकावर मतदान घेण्यात आले. यात 298 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने आणि 230 खासदारांनी विरोधत मतदान केले. हे घटना दुरुस्ती विधेयक असल्याने 2\3 मतदान न झाल्याने विधेयक नामंजूर झाले. यामुळे महिला आरक्षण विधेयक पास होऊ शकले नाही. यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काँग्रेस पक्ष मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झाला – प्रधान

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘काँग्रेस पक्ष मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झाला आहे. काँग्रेस पक्षाने आपला महिला-विरोधी चेहरा उघड केला आहे, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी विरोधी मानसिकताही स्पष्ट केली आहे. त्यांनी देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या आकांक्षा गळा घोटून मारल्या आहेत. आज हे लोक ओबीसींच्या नावाखाली बनावट अश्रू ढाळत आहेत; हे असे लोक नाहीत ज्यांना देशातील महिलांच्या अपेक्षा आणि आकांक्षा समजतात.’

विरोधकांवर सडकून टीका

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना प्रधान म्हणाले की, ‘काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना महिलांना मिळणाऱ्या हक्कांमुळे सर्वाधिक त्रास होत आहे आणि आपली हीच कुंठा लपवण्यासाठी ते परिसीमनच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, संसदेत विधेयकाला त्यांनी केलेल्या विरोधामुळे देशातील महिला शक्तीबद्दलची त्यांची नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा देशासमोर उघड झाली आहे.

आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस यांसह विरोधी पक्ष हे महिला, ओबीसी आणि उत्तर-दक्षिण यांच्या नावाखाली देशात फूट पाडणारे आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या राजकीय स्वार्थासाठी खोटेपणाचा आधार घेतला आहे. त्यांनी कधीच देशाला सांगितले नाही की सत्ता टिकवण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कधी परिसीमन केले, तर कधी देशावर आणीबाणी लादून तीच प्रक्रिया स्वतःच्या फायद्यासाठी थांबवली.

महिला विरोधकांना माफ करणार नाहीत – प्रधान

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणलेली तीनही विधेयके ही महिला सक्षमीकरण आणि देशहित लक्षात घेऊन होती. मात्र, विरोधकांचा दृष्टिकोन पाहता असे दिसते की त्यांनी देशातील महिलांविरोधात एक सुनियोजित कट रचला आहे. आज देशातील महिला शक्तीने विरोधकांची प्रत्येक चाल, प्रत्येक कारण आणि प्रत्येक षड्यंत्र बारकाईने पाहिले आहे आणि देशातील महिला या महिला-विरोधी पक्षांना कधीही माफ करणार नाहीत.

 

Follow Us