
आपण अनेकदा प्लास्टिकला पर्याय म्हणून काचेच्या बाटल्या वापरतो. त्या पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी चांगल्या, असं आपण मानतो. पण फ्रान्समधील एका नवीन अभ्यासाने या समजुतीला धक्का दिला आहे! हा अभ्यास सांगतो की, काचेच्या बाटल्यांमधूनही आपल्या पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक मिसळू शकतं… कदाचित प्लास्टिकच्या बाटल्यांपेक्षाही जास्त!
अभ्यासात काय आढळलं?
फ्रान्सच्या अन्न सुरक्षा संस्थेने (ANSES) केलेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांना धक्कादायक निष्कर्ष मिळाले. त्यांना Cold Drinks, लिंबू सरबत आणि Beer यांसारख्या पेयांच्या काचेच्या बाटल्यांमध्ये प्रति लिटर सरासरी १०० मायक्रोप्लास्टिक कण सापडले. ही संख्या प्लास्टिकच्या बाटल्या किंवा धातूच्या Cans मध्ये आढळलेल्या कणांपेक्षा जवळपास 50 पट जास्त होती!
शास्त्रज्ञांच्या मते, या प्रदूषणाचं मुख्य कारण बाटलीचं धातूचं झाकण असू शकतं. झाकणावरील रंगाचे अत्यंत सूक्ष्म कण बाटली उघडताना किंवा बंद करताना पेयात मिसळण्याची शक्यता आहे. विशेषतः बियरच्या बाटल्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आढळलं. याउलट, साध्या पाण्यात आणि सोडा मध्ये मात्र मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण खूप कमी होतं, मग ते कोणत्याही पॅकेजिंगमध्ये असो. एक दिलासादायक बाब म्हणजे, वाईनच्या बाटल्या, ज्यांना कॉर्कचे बूच असतात, त्या कमी दूषित आढळल्या.
यावर काही उपाय आहे का?
हे प्रदूषण का होतं याबद्दल अजून पूर्ण स्पष्टता नसली तरी, एक संभाव्य उपाय संशोधकांनी सुचवला आहे. बाटल्यांची झाकणं जर व्यवस्थित धुवून आणि इथेनॉल-पाण्याच्या मिश्रणाने स्वच्छ केली, तर त्यातून पेयात मिसळणाऱ्या मायक्रोप्लास्टिक कणांची संख्या बरीच कमी होऊ शकते.
मायक्रोप्लास्टिकचा धोका
मायक्रोप्लास्टिक म्हणजे 5 मिलिमीटरपेक्षा लहान असलेले प्लास्टिकचे कण. हे कण आता पर्यावरणात सर्वत्र पसरले आहेत. समुद्राच्या तळापासून ते उंच पर्वतांपर्यंत. ते आपल्या अन्नसाखळीत आणि पिण्याच्या पाण्यातही मिसळले आहेत. मानवी आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात, यावर अजून संशोधन सुरू आहे, पण ते नक्कीच चिंतेचा विषय आहेत. 1950 पासून प्लास्टिकचं उत्पादन प्रचंड वाढलं आहे आणि त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे न झाल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.