
Pahalgam attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर तपास संस्थांनी धडक कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. एनआयए या प्रकरणाशी निगडीत विविध पैलूंवर तपास करत आहेत. एनआयएच्या तपासातून महत्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा कट आहे. एनआयएच्या अहवालानंतर गृहमंत्रालय दोन दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी शस्त्र बेताब खोऱ्यात लपवली होती. हे खरे हल्ला झाला त्या बैसरन खोऱ्याच्या ठिकाणापासून दहा किलोमीटर लांब आहे. या हल्ल्यात ओव्हर ग्राउंड वर्करचा (OGW) सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एनआयएने 3D मॅपिंग आणि रिक्रिएशन रिपोर्ट तयार केला आहे.
एनआयएने ओव्हर ग्राउंड वर्कर्सच्या संपर्कात असलेल्या लोकांची यादी तयार केली आहे. त्यामुळे ओजीडब्लूवर आता कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनआयएच्या अहवालात पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा उल्लेख आहे. दहशतवादी पीओकेमधील हँडलरच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. एनआयएच्या महासंचालकांनी हा अहवाल गृहमंत्रालयाला दिला आहे.
एनआयएने रिपोर्टमध्ये दोन मास्टरमाइंडचे नाव घेतले आहे. त्यात दहशतवादी हाशमी मूसा आणि अली भाई उर्फ तल्हा भाई याचा उल्लेख आहे. त्या दोघांचा पाकिस्तान कनेक्शनसोबत सविस्तर माहिती दिली आहे. हाशिम मूसा आणि तल्हा भाई हे पाकिस्तानचे नागरिक आहेत. हा हल्ला घडवण्यासाठी ते मागील अनेक दिवसांपासून हँडलरच्या संपर्कात होते. त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून निर्देश दिले जात होते. आयएसआयच्या इशाऱ्यानंतर लष्करच्या मुख्यालयात पहलगाम हल्ल्याचा कट रचला गेला.
पहलगामध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत पावले उचलली आहे. तसेच भारतीय लष्कराला कारवाईचे संपूर्ण अधिकार दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानवर कधी कारवाई होणार? त्याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.