आम्ही सर्वांचे बॉस आहोत…, राजनाथ सिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिले चोख प्रत्युत्तर
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. 'काही लोक भारताच्या विकासावर नाराज आहेत. त्यांना भारताचा विकास होत आहे हे आवडत नाही' असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडले आहेत. अशातच आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. राजनाथ सिंग यांनी ‘काही लोक भारताच्या विकासावर नाराज आहेत. त्यांना भारताचा विकास होत आहे हे आवडत नाही’ असं विधान केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे मध्य प्रदेशातील रायसेन येथे रेल्वे कोच फॅक्टरीची पायाभरणी करण्यासाठी आले होते. यावेली बोलताना सिंग यांनी म्हटले की, ‘जगात काही लोक असे आहेत ज्यांना भारताची जलद प्रगती आवडत नाही. त्यांना ते आवडत नाही. मात्र आम्ही सर्वांचे बॉस आहोत. ते विचार करत आहेत की भारत इतक्या वेगाने कसा प्रगती करत आहे? बरेच लोक भारतीयांच्या वस्तू इतर देशांमध्ये बनवलेल्या वस्तूंपेक्षा महाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. याद्वारे भारतीय वस्तूंची मागणी कमी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र भारत वेगाने प्रगती करत आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो की आता जगातील कोणतीही शक्ती भारताला जगातील मोठी शक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही.
संरक्षण क्षेत्रात भारताची प्रगती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, ‘पूर्वी संरक्षण क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या वस्तू परदेशात बनवल्या जात होत्. जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांची गरज पडायची तेव्हा आम्ही खरेदी करायचो. यात विमाने आणि शस्त्रांचा समावेश होता. मात्र आता यापैकी बहुतेक गोष्टी केवळ भारतातच नाही तर भारत स्वतः बनवत आहे. तसेच त्या वस्तू आता इतर देशांमध्ये देखील निर्यात केल्या जात आहेत. या क्षेत्रात भारत प्रगती करत आहेत.
संरक्षण उत्पादनांची निर्यात वाढली
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा भारत फक्त 600 कोटींची संरक्षण उत्पादने निर्यात करत होता. आता आपण 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या संरक्षण वस्तू निर्यात करत आहोत. ही भारताची ताकद आहे आणि हे नवीन भारताचे नवीन संरक्षण क्षेत्र आहे. त्याची निर्यात सतत वाढत आहे आणि वाढतच राहील.
