Operation Sindoor : 10 मे च्या मध्यरात्री भारताने अशी एक गोष्ट केली की, त्यामुळेच पाकिस्तानला याव लागलं शरण

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. इंडियन एअर फोर्सने 10 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानात तांडव केलच. पण पाकिस्तानच्या कल्पनेपलीकडची अशी एक गोष्ट केली की, ते पार हादरुन गेले. त्यांना शरण याव लागलं. वाचा ती Inside Story.

Operation Sindoor : 10 मे च्या मध्यरात्री भारताने अशी एक गोष्ट केली की, त्यामुळेच पाकिस्तानला याव लागलं शरण
| Updated on: May 26, 2025 | 9:57 AM

ऑपरेशन सिंदूर संदर्भात आलेल्या एका नव्या रिपोर्टने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. तीन दिवस पाकिस्तानने युद्धाची खुमखुमी दाखवली. पण 10 मे च्या मध्यरात्री इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानात अक्षरक्ष: तांडव केलं. त्यात पाकिस्तानच किती नुकसान झालं, त्याची माहिती समोर आलीय. भारताची मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम आणि भारतीय मिसाईल्सचा अचूक प्रहार यामुळे पाकिस्तान लगेच गुडघ्यावर आला. चीनची एअर डिफेन्स सिस्टिम भारतीय हल्ल्यांपासून पाकिस्तानच रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. भारताच्या ब्रह्मोस मिसाइलच्या मारक क्षमतेने पाकिस्तान अजूनही घाबरलेला आहे. 10 मे च्या मध्यरात्री भारताने असं काय केलं, ज्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेसमोर अक्षरक्ष: याचना करावी लागली.

इंडियन एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी 10 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानवर चार ठिकाणी मिसाइल हल्ले केले. राफेलमधून स्काल्प आणि सुखोई SU-30 MKI मधून ब्राह्मोस मिसाईल्स डागण्यात आले. चकालाच्या नूर खान एअरबेसवर ब्राह्मोसद्वारे पहिला हल्ला करण्यात आला. त्यात पाकिस्तानचं उत्तरेकडचं एअर कमांड आणि कंट्रोल नेटवर्कच उद्धवस्त झालं. शेवटचा हल्ला जकोबाबाद आणि भोलारी एअर बेसवर करण्यात आला. तो पर्यंत पाकिस्तान गुडघ्यावर येऊन सीजफायरसाठी अमेरिकेसाठी भीख मागत होता.

मध्यरात्री पाकिस्तानचे जे मेसेज इंटरसेप्ट केले त्यात काय होतं?

ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने 10 मे च्या मध्यरात्री 1 वाजता ऑपरेशन ‘बुनयान अल-मरसूस’ लॉन्च केलं. पुढच्या 48 तासात भारतीय एअरबेसेस उद्धवस्त करण्याच त्यांनी लक्ष्य ठेवलं होतं. पाकिस्तानातील जे कम्युनिकेशन इंटरसेप्ट केले, त्यातून ही माहिती समोर आली. हिंदुस्थान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. पण IAF असा हवाई हल्ला चढवला की, पाकिस्तानला अवघ्या काही तासात ‘बुनयान अल-मरसूस’ ऑपरेशन गुंडाळाव लागलं.

S-400 एअर डिफेन्स सिस्टिम कितीवेळा वापरली?

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आदमपूर बेसवरील S-400 एअर डिफेन्स सिस्टिम 11 वेळा वापरली. पाकिस्तानच SAAB-2000 एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टिमच विमान 315 किलोमीटर आतमध्ये होतं. तिथपर्यंत खोलवर प्रहार करुन हे विमान पाडलं. SAAB-2000 हे रडार प्लेन आहे. या विमानाद्वारे कुठून कसा हवाई हल्ला होणार त्याची माहिती मिळते. इंडियन एअर फोर्सने हे विमान पाडून पाकिस्तानला आंधळ करुन सोडलं.

पाकिस्तानची कुठली विमान पाडली त्याची माहिती

भारतीय मिसाईल्सनी पाकिस्तानच C-130 J, JF-17 आणि दोन F-16 विमानं पाडल्याचे पुरावे इंडियन एअर फोर्सकडे आहेत. टार्गेट चुकू नये म्हणून IAF ने स्काल्प आणि ब्राह्मोस ही दोन्ही मिसाइल्स वापरली. पाकिस्तान एअर फोर्सच इतकं नुकसान झाल्यानंतर आपण लढू शकत नाही, हे पाकिस्तानला कळून चुकलं. भारताकडून अजून मार पडू नये म्हणून त्यांनी शरणागती पत्करुन अमेरिकेसमोर सीजफायरची याचना केली. इंडियन एअर फोर्सने या ऑपरेशनद्वारे संपूर्ण जगाला आपली ताकद आणि कौशल्य दाखवून दिलं.