ऑपरेशन सिंदूर म्हणजे युद्धाचं सायरन? आता पाकिस्तानही चवताळला, जाणून घ्या भविष्यात काय होणार?
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणं हाच या ऑपरेशनमागील उद्देश होता, असं भारताने स्पष्ट केलं आहे.

ऑपरेशन सिंदूर म्हणजे युद्धाचं सायरन? आता पाकिस्तानही चवताळला, जाणून घ्या भविष्यात काय होणार?
भारताने पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा जशास तसा बदला घेतला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या 9 ठिकाणी हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत दहशतवाद्यांचे तळ आणि मुख्यालये उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. असे असतानाच आता भारताचे हे एअर स्ट्राईक म्हणजे युद्धाला सुरुवात तर नाही ना? असं विचारलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात नेमकं काय होणार? हे जाणून घेऊ या…
पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केलेलं नाही
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणं हाच या ऑपरेशनमागील उद्देश होता, असं भारताने स्पष्ट केलं आहे. भारताने आपल्या या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केलेलं नाही. या ऑपरेशनमध्ये फक्त पाकिस्तान आणि पीओके येथील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलंय. याच ठिकाणांहून भारतावर हल्ल्याची योजना बनवण्यात येत होती.
आम्हाला युद्ध छेडायचं नाही
आम्हाला कोणालाही चिथावणी द्यायची नाही किंवा कोणालाही युद्धासाठी प्रेरित करायचं नाही, असं भारतानं स्पष्ट केलंय. त्यामुळे या कारवाईच्या माध्यमातून आम्हाला युद्ध छेडायचं नाही, असंच भारताने स्पष्ट केलंय. पाकिस्तानने मात्र आपली ओरड चालू केली आहे. हा हल्ला म्हणजे युद्ध छेडण्यासारखंच आहे, असा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. भारताने कलेल्या या हल्ल्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यात पाकिस्तानची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्यांच दिसत आहे.
पाकिस्तान काय करू शकतो?
दरम्यान, भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानही प्रत्युत्तर म्हणून कारवाई करू शकतो. हीच बाब लक्षात घेता भारतीय लष्कर, वायू सेना तसेच नौसेने सज्ज आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील एअरबेसवर हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. पाकिस्तानने हल्ला केलाच तर जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे.
वेगवेगळ्या देशांना दिली हल्ल्याची माहिती
भारताच्या या कारवाईनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे विदेसमंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली आहे. भारताने अमेरिकेला या हल्ल्याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. भारत, ब्रिटन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, रशिया या देशांनाही भारताने आपल्या या स्ट्राईकबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
