PM मोदींचा ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद, आगामी काळात गुंतवणूक वाढणार

PM Modi :पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया एनर्जी वीक (IEW) 2026 च्या निमित्ताने जागतिक ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (CEO) संवाद साधला.

PM मोदींचा ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद, आगामी काळात गुंतवणूक वाढणार
PM Modi
Image Credit source: Google
| Updated on: Jan 28, 2026 | 10:32 PM

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी सुरू असलेल्या इंडिया एनर्जी वीक (IEW) 2026 च्या निमित्ताने जागतिक ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (CEO) संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताच्या विकासाच्या वाटचालीवर दृढ विश्वास व्यक्त केला. धोरणात्मक स्थिरता, सुधारणांची गती आणि दीर्घकालीन मागणीची स्पष्टता या बाबींचा उल्लेख करत, त्यांनी भारतात आपला व्यावसायिक विस्तार आणि उपस्थिती अधिक दृढ करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणूक आणखी वाढणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘या गोलमेज परिषदा उद्योग आणि सरकार यांच्यातील समन्वयासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आल्या आहेत. जागतिक उद्योग नेत्यांकडून मिळणारा थेट अभिप्राय धोरणात्मक आराखडे सुधारण्यास, क्षेत्रातील आव्हानांवर अधिक प्रभावीपणे मात करण्यास आणि एक आकर्षक गुंतवणूक स्थळ म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यास मदत करतो.

भारताच्या मजबूत आर्थिक गतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारत आगानी काळात जागतिक ऊर्जा मागणी-पुरवठा संतुलनात निर्णायक भूमिका बजावेल. पंतप्रधानांनी भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संधींकडे लक्ष वेधले.

सरकारने सुरू केलेल्या गुंतवणूकदार-स्नेही धोरणात्मक सुधारणांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी अन्वेषण आणि उत्पादनामध्ये सुमारे 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची क्षमता अधोरेखित केली. त्यांनी संकुचित बायो-गॅस (CBG) क्षेत्रातील 30 अब्ज डॉलर्सच्या संधीवरही भर दिला. याव्यतिरिक्त, त्यांनी गॅस-आधारित अर्थव्यवस्था, रिफायनरी-पेट्रोकेमिकल एकत्रीकरण आणि सागरी व जहाजबांधणी यासह व्यापक ऊर्जा मूल्य साखळीतील मोठ्या संधींची रूपरेषा मांडली.

पंतप्रधानांनी यावेळी म्हटले की, जागतिक ऊर्जा क्षेत्रात अनिश्चितता असली तरी, त्यात प्रचंड संधीही आहेत. त्यांनी नावीन्यपूर्णता, सहकार्य आणि सखोल भागीदारीचे आवाहन केले आणि संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीत भारत एक विश्वसनीय भागीदार म्हणून तयार आहे, असे पुनरुच्चारित केले. या उच्च-स्तरीय गोलमेज परिषदेत टोटलएनर्जीज, बीपी, विटोल, एचडी ह्युंदाई, एचडी केएसओई, एकेर, लँझाटेक, वेदांता, आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच (आयईएफ), एक्सेलरेट, वुड मॅकेन्झी, ट्रॅफिगुरा, स्टॅट्सोली, प्राज, रिन्यू आणि एमओएल यासह आघाडीच्या जागतिक आणि भारतीय ऊर्जा कंपन्या व संस्थांचे 27 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ कॉर्पोरेट मान्यवर सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री श्री सुरेश गोपी आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.