
आज (26 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 127 वा भाग प्रसारित झाला. आजच्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना छठपुजेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर राष्ट्रगीत, वंदे मातरम, ही भारताची जिवंत आणि उत्साही प्रतिमा प्रतिबिंबित करणारी गीते असल्याचे म्हटले आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमाची महत्त्वाची बाब म्हणजे पीएम मोदींचे भाषण एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी, तेलगूसह सुमारे 11 भारतीय भाषांमध्ये प्रसारित करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी सांस्कृतिक आणि आर्थिक उपक्रमांच्या प्रचाराचे कौतुक केले. तसेच आजच्या कार्यक्रमाद्वारे भारत सरकारने एआयच्या मदतीने 11 भाषांमध्ये पंतप्रधानांचे भाषण प्रसारित करत भविष्यात एआय आणि नवीन तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या आधुनिक भारताची झलक दाखवली. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने एआयसह अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. भारत एआयमध्ये चीन आणि पाश्चिमात्य देशांना टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचीच एक झलक आज पहायला मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचा 127 वा भाग आज प्रसारित करण्यात आला. पंतप्रधानांचे हे भाषण एआयच्या मदतीने 11 भाषांमध्ये प्रसारित झाले. यात मल्याळम, तेलगू, कन्नड, इंग्रजी, गुजराती, बंगाली, तमिळ, मराठी, आसामी आणि उडिया या भाषांचा समावेश होता. एआयच्या मदतीने लाखो लोकांना पंतप्रधानांचा संदेश एकाच वेळी वेगवेगळ्या भाषांमध्ये ऐकता आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त देशवासीयांना याचे मूल्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या भाषणात पंतप्रधानांनी बीएसएफ आणि सीआरपीएफमधील स्थानिक कुत्र्यांच्या उत्कृष्ट भूमिकेचे आणि शौर्याचे कौतुक केले. त्याचबरोबर पंतप्रधानांनी सांस्कृतिक आणि आर्थिक उपक्रमांच्या प्रचाराचेही कौतुक केले.
संस्कृत भाषेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, संस्कृती आणि सोशल मीडियाच्या जगाने संस्कृतला जीवनाची एक नवीन संधी दिली आहे. सध्या अनेक तरुण रीलद्वारे या भाषेत बोलत आहेत आणि त्याबद्दल जागरूकता पसरवत आहेत. ही या भाषेसाठी महत्त्वाची बाब आहे.