नॉर्थ ईस्ट फक्त भौगोलिक दिशा नाही, तर सामर्थ्याचंही प्रतिक : नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या रायझिंग नॉर्थ-ईस्ट इन्व्हेस्टर्स समिटमध्ये उत्तरपूर्व भारताच्या आर्थिक विकासावर भर दिला. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी या भागात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. उत्तरपूर्व हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून, व्यापार, पर्यटन आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी संधींचा केंद्रबिंदू आहे असे मोदी यांनी स्पष्ट केले.

आमच्यासाठी उत्तरपूर्व हा केवळ एक भौगोलिक दिशा नाही. ते सामर्थ्य आणि शक्तीचंही प्रतीक आहे. व्यापार असो, परंपरा असो, वस्त्र उद्योग असो की पर्यटन… उत्तरपूर्वेतील विविधतेतूनच त्याची खरी ताकद निर्माण होते. उत्तरपूर्व म्हणजे बायो-इकॉनॉमी, चहा उद्योग, पेट्रोलियम, क्रीडा आणि पर्यटनाचं केंद्र आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नवी दिल्लीत आयोजित रायझिंग नॉर्थ-ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. देशाच्या उत्तरपूर्व भागात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनात देशातील नामांकित उद्योजक, उद्योगपती, व्यापारी आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
गेल्या 11 वर्षात नॉर्थ ईस्टमध्ये जे परिवर्तन आलं आहे, ती केवळ आकड्यांची गोष्ट नाही. जमीन आणि महसूलात होणारा हा बदल आहे. आम्ही नॉर्थ ईस्टसोबत केवळ योजनांच्या माध्यमातून नातं तयार केलं नाही, तर आम्ही हृदयापासून नातं बनवलं आहे. 700 हून अधिक वेळा केंद्र सरकारमध्ये नॉर्थ ईस्टमधील मंत्री होते. पण माझा नियम केवळ जाऊन येणं नव्हता. नाइट स्टे करणं कंपल्सरी होतं. आम्ही केवळ विटा आणि सिमेंटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं नाही. आम्ही त्याला इमोशनल कनेक्टचं माध्यम बनवलं. एकेकाळी नॉर्थ ईस्टला केवळ फ्रंटियर रीजन म्हटलं जायचं. आज तो ग्रोथचा फ्रंट रनर बनला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
म्यानमार, थायलंड थेट हायवेने कनेक्ट
नॉर्थ ईस्टमध्ये जमीन तयार झालेली आहे. आपल्या इंडस्ट्रीला पुढाकार घेऊन या संधीचा लाभ उठवला पाहिजे. फर्स्ट मुव्हर अॅडव्हांटेजची संधी सोडू नका. आज भारत आणि आसियान दरम्यानचा ट्रेड व्हॅल्यूम जवळपास 125 अब्ज डॉलर आहे. येत्या काळात तो 200 अब्ज डॉलर पार होईल. यात उत्तर पूर्वेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. भारत, म्यानमार आणि थायलंडच्या दरम्यान हायवेने थेट संपर्क होईल. इंडस्ट्रीसाठी हे फार मोठं वरदान असेल, असं सांगतानाच डेस्टिनेशन वेडिंगसाठीही नॉर्थ ईस्ट अप्रतिम जागा असल्याचं ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं कौतुक
या कार्यक्रमात पंतप्रधानांसह रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि उद्योगपती मुकेश अंबानीही सहभागी झाले होते. अंबानी यांनी वेळी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींचं कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरच्या अफाट यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनःपूर्वक शुभेच्छा. हे यश आपल्या सशस्त्र दलांच्या अद्वितीय शौर्याचं प्रतीक आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले.
75 हजार कोटी गुंतवणार
ऑपरेशन सिंदूरच्या उल्लेखासोबतच उत्तरपूर्वेतील गुंतवणुकीचं आश्वासनही अंबानी यांनी दिलं. येत्या पाच वर्षांत रिलायन्स उत्तरपूर्वेतील कृषी, टेलिकॉम, डिजिटल सेवा आणि स्थानिक व्यवसायांच्या विकासासाठी 75,000 कोटी रुपये गुंतवणार आहे, अशी घोषणा अंबानी यांनी केली.
अदानी यांची घोषणा
त्याचप्रमाणे, अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांनीही उत्तरपूर्वेतील विकासासाठी वचन दिलं. पुढील 10 वर्षांत अदानी समूह हरित ऊर्जा, रस्ते आणि डिजिटल पायाभूत सुविधांसाठी या भागात 50,000 कोटी रुपये गुंतवेल, असं गौतम अदानी यांनी जाहीर केलं.