
अंतराळवीर शुभांशू शुक्ला काही दिवसांपूर्वी अंतराळात गेले आहेत, ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात विविध प्रयोग करत आहेत. आज भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन असलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. हा संवाद भारताच्या अंतराळ इतिहासातील एक नवीन अध्याय आहे. आगामी काळात भारत स्वबळावर अशाप्रकारच्या मिशन आयोजित करणार आहे.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे 40 वर्षांहून अधिक काळानंतर अंतराळात जाणारे भारतीय अंतराळवीर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी शुक्ला यांच्या धाडसाचे आणि योगदानाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
दोघांमध्ये काय बोलणं झालं?
पंतप्रधान मोदींनी विचारले, अंतराळात सर्व काही ठीक आहे का? यावर उत्तर देताना शुभांशू म्हणाले की, ‘खूप छान वाटत आहे. हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. माझा हा प्रवास पृथ्वीपासून कक्षेपर्यंतचा 400 किलोमीटरचा प्रवास आहे. मला वाटते की हा केवळ माझा प्रवास नाही तर भारतीयांचा प्रवास आहे.मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आहे.’
PM @narendramodi interacted with Group Captain Shubhanshu Shukla, who is aboard the International Space Station. pic.twitter.com/Q37HqvUwCd
— PMO India (@PMOIndia) June 28, 2025
मिशन अॅक्सिओम 4
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आपल्या इतर तीन सहकाऱ्यांसह 25 जून रोजी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने केनेडी स्पेस सेंटरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी साठी रवाना झाले होते. हे मिशन अॅक्सिओम-4 चा भाग आहे. अॅक्सिओम-4 मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी मिशन पायलट शुक्ला आणि इतर क्रू मेंबर्सचे अभिनंदन केले होते आणि त्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
राकेश शर्मा यांच्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे 41 वर्षांनंतर अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर बनले आहेत. हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, ‘अंतराळ स्थाकात जाणारे शुक्ला आपल्यासोबत 1.4 अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा घेऊन गेले आहेत.’
नासा आणि इस्रो यांची मोहीम
गुरुवारी अक्सिओम-4 मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयानाने यशस्वीरित्या डॉकिंग पूर्ण केले. शुभांशू शुक्ला मिशनमध्ये केल्या जाणाऱ्या 60 पैकी 7 प्रयोगांचे नेतृत्व करणार आहेत. अॅक्सिओम-4 मोहीम नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्यातील संयुक्त मिशन आहे.