
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी आज (शनिवार) पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेट (मोदी आणि ट्रम्प यांचा फोटो) आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेला एक खास मेसेज दिला. गोर यांनी दिलेल्या या फोटोवर ट्रम्प यांनी मोदींचा उल्लेख ‘मित्र’ असा केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांना उद्देशून लिहिले, “पंतप्रधान, तुम्ही महान आहात.” याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे सर्जियो गोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत दोघांनी संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानासह अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी सर्जियो गोर यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील अशी आशा व्यक्त केली. गोर सध्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात ते अनेक भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत.
या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर गोर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यात पंतप्रधान मोदींनी लिहिले की, मला विश्वास आहे की नवीन अमेरिकन राजदूताच्या काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होईल. राजदूत सर्जियो गोर यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.’
या भेटीनंतर गोर यांनी पंतप्रधान मोदींसोबतची त्यांची भेट खास असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना वैयक्तिक मित्र मानतात. अमेरिकेने नेहमीच भारतासोबतच्या संबंधांना विशेष महत्त्व दिले आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीपूर्वी, गोर यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचीही भेट घेतली होती.
Glad to receive Mr. Sergio Gor, Ambassador-designate of the US to India. I’m confident that his tenure will further strengthen the India–US Comprehensive Global Strategic Partnership.@SergioGor pic.twitter.com/WSzsPxrJXv
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2025
भारतातील प्रमुख नेत्यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना गोर म्हणाले की, “मी भारतात येणे हा सन्मान आणि सौभाग्य आहे. पंतप्रधान मोदींसोबत नुकतीच एक अद्भुत बैठक झाली. यात आम्ही संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानासह द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही महत्त्वाची खनिजे किती महत्त्वाची आहेत आणि दोन्ही देशांसाठी त्यांचे महत्त्व काय आहे. अमेरिका भारतासोबतच्या संबंधांना महत्त्व देत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाखाली मी दोन्ही देशांचे भविष्य उज्ज्वल असेल अशी मला आशा आहे.