परदेशात जाऊन लग्न करू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन; म्हणाले भारतात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण-तरुणी तसेच पालकांना परदेशात जाऊन लग्न करण्याबाबत मोठे आवाहन केले आहे. परदेशात जाऊन लग्न करण्यापेक्षा भारतातच लग्न करावे, असे मोदी म्हणाले आहेत.

Narendra Modi On Marriage : अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे आखीत प्रदेश धगधगत आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत. या युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेलची किंमत वाढण्याची दाट शक्यता आहे. गॅस सिलिंडरचा भाव तर याआधीच वाढला आहे. हे युद्ध सध्याच संपण्याची शक्यता नाही. त्यामुळेच भविष्यातील संकट ओळखून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काही महत्त्वाचे आवाहन केले आहे. पुढच्या एक वर्ष सोन्याची खरेदी करू नका, असे मोदी म्हणाले आहेत. आता पुन्हा एकदा मोदी यांनी नागरिकांना नवे आवाहन केले आहे. डेस्टिनेशन वेडिंगबद्दल त्यांनी समस्त देशांना हे आवाहन केलंय.
परदेशात जाऊन लग्न करण्यापेक्षा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अलिकडे वाढत चाललेल्या डेस्टिनेशन वेडिंगवर भाष्य केलं. तरुण-तरुणींनी परदेशात न जाता भारतातच विवाह सोहळे आयोजित करावेत, असे मोदी म्हणाले. आपल्या भाषणात बोलताना ‘एक खूपच महत्त्वाचा विषय आहे. आजकाल ही फॅशनच झाली आहे. सुट्ट्या लागल्या की पालक पोरांना विदेशात जाऊन या सुट्ट्या घालवण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देतात. आजकाल परदेशात फिरायला जाण्याचे, तिथे जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे फॅड वाढले आहे. परदेशात जाऊन लग्न करण्याची फॅशन वाढत आहे. परंतु यामुळे परदेशी चलन खूप जास्त खर्च होते, असे मोदी म्हणाले.
देशात विवाह सोहळे आयोजित केले तर…
तसेच, आपण आपल्या मुलांना आपल्याच देशात फिरायला पाठवू शकत नाही का? आपल्या देशात एकही असे ठिकाण नाही का? आपण आपल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर अभिमान बाळगला पाहिजे. भारतातच आपण आपली सुट्टी घालवायला हवी. लग्न समारंभासाठीही भारतापेक्षा जास्त पवित्र जागा दुसरी कोणतीच असू शकत नाही. आपण आपल्या देशातच जेव्हा विवाह सोहळे करतो तेव्हा या देशाची मातीदेखील आपल्याला आशीर्वाद देते. भारतात लग्न करण्यासाठी खूप चांगली ठिकाणं आहेत. या ठिकाणांची निवड करावी, असे आवाहन मोदी यांनी केले.