देशासाठी स्वाभिमान महत्त्वाचा, डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
भारताने आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आत्मनिर्भरतेवर भर दिला. देशाच्या स्वातंत्र्याचा आणि विकासाचा प्रवास, संविधानाचे महत्त्व आणि आत्मनिर्भरतेचा देशाच्या सुरक्षेसाठी असलेला महत्त्वाचा भाग यावर प्रकाश टाकला गेला.

आज भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवला. तसेच देशाला संबोधित केले. आज देशात मातृभूमीचं जयगान गायलं जातं आहे. हे स्वातंत्र्य पर्व १४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाचे आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात आशा आहे. तसेच एकता अधिक मजबूत होत आहे. आज सर्व देश तिरंग्याच्या रंगात रंगला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी लोकांच्या गौरवाचं पर्व आहे. प्रत्येक मनात आशा आणि अपेक्षा आहेत. देश एकतेच्या भावनेला निरंतर बळकट करत आहे. १४० कोटी देशातील नागरिक आज तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत. १९४७ मध्ये आपला देश स्वतंत्र झाला. देशाच्या आशा अपेक्षा उड्डाण घेत होत्या, मात्र आव्हानं प्रचंड प्रमाणात होती. आज देशभरातून मातृभूमीचा जयघोष ऐकू येतो आहे. महात्मा गांधींच्या सिद्धांतावर चालत असताना संविधान सभेच्या सदस्यांनी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. भारताचं संविधान ७५ वर्षांपासून दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवतो आहे. अनेक महापुरुषांनी जसे की डॉ. राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, पंडीत नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सर्वपल्ली राधाकृष्णन या सगळ्यांनीच संविधान निर्मितीसाठी योगदान दिलं. नारी शक्तीमधल्या विदुषींनीही भारताचं संविधान सशक्त केलं. आज लाल किल्ल्यावरुन देशाला दिशा देणाऱ्या संविधानाची निर्मिती करणाऱ्यांना आदराने नमन करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आज आपण डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंतीही साजरी करत आहोत. संविधानासाठी बलिदान देणारे ते पहिले महापुरुष होते. देशातील कलम ३७० ची भिंत पाडून आपण एक देश एक संविधान हे स्वप्न साकार केलं. तेव्हा आम्ही शामाप्रसाद मुखर्जींना खऱ्या अर्थाने खरी आदरांजली दिली. आज या कार्यक्रमात विशेष लोक उपस्थित आहेत. खेळ विश्वाशी जोडलेले लोक उपस्थित आहेत. अनेक क्षेत्रातले लोक उपस्थित आहेत. मी एक प्रकारे लघू भारताचं दर्शन करतो आहे. तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्यांवर अवलंबून राहणे राष्ट्रासाठी खूप धोकादायक
एखाद्या देशासाठी स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा असतो. हा स्वाभिमान देश किती आत्मनिर्भर आहे यावर ठरतो. आजच्या काळात, विकसित होणाऱ्या कोणत्याही देशासाठी आत्मनिर्भरता हाच विकासाचा पाया आहे. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशांवर जास्त अवलंबून असतो, तेव्हा त्याचे स्वातंत्र्य धोक्यात येते. याचाच अर्थ दुसऱ्यांवर अवलंबून राहणे ही एक वाईट सवय आहे. ही सवय राष्ट्रासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, प्रत्येक क्षणी आपण जागरूक राहणे आवश्यक आहे. आत्मनिर्भरतेचा संबंध केवळ आयात आणि निर्यात, रुपये, पैसे, पाउंड, डॉलर यांच्याशी नाही. तर याचा संबंध आपल्या देशाच्या सामर्थ्याशी जोडलेला आहे. आपले सामर्थ्य टिकवून ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी आत्मनिर्भर असणे खूप महत्त्वाचे आहे.
आपण आत्मनिर्भर नसतो, तर
याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’. या ऑपरेशनमध्ये, भारताने आपल्याच देशात बनवलेल्या (मेड इन इंडिया) शस्त्रांचा वापर केला. शत्रूला हे कळलेच नाही की त्यांच्यावर कशाने हल्ला होत आहे. जर आपण आत्मनिर्भर नसतो, तर आपल्याला युद्धसामग्रीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागले असते. कोण आपल्याला मदत करेल? या विचारातच आपला वेळ गेला असता. पण मेड इन इंडियामुळे आपली सेना कोणत्याही अडथळ्याविना, कोणत्याही चिंतेविना आपले काम करू शकली. गेल्या १० वर्षांपासून भारत सरकार संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि आता त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
