भारत-पाकिस्तान तणाव, पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, राजनाथ सिंग, डोभाल यांच्यासह तीनही सेना प्रमुख उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली, या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची देखील उपस्थिती होती.

भारत-पाकिस्तान तणाव, पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, राजनाथ सिंग, डोभाल यांच्यासह तीनही सेना प्रमुख उपस्थित
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 09, 2025 | 8:20 PM

गुरुवारी पाकिस्ताननं पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न केला, भारतातील तीन राज्य पाकिस्तानच्या टार्गेटवर होते, जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु भारताच्या डिफेंन्स यंत्रणेनं पाकिस्तानचा हा हल्ला परतून लावला, भारतानं पाकिस्तानचे आठ मिसाईल पाडले, भारतानं पाकिस्तानचा ड्रोन हल्ला परतवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली, या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची देखील उपस्थिती होती.

गुरुवारी रात्री पुन्हा एकदा भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. तुर्कीने दिलेल्या ड्रोनच्या मदतीनं पाकिस्तानने भारतावर हा हल्ला केला. 36 ठिकाणी पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संरक्षण प्रणालीनं हा हल्ला परतून लावला आहे, दुसरीकडे पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये 9 दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान या बैठकीपूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलातील माजी सौनिकांच्या गटाची देखील भेट घेतली आहे. यामध्ये माजी हवाई दल प्रमुख, लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख आणि इतर काही महत्त्वाच्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश होता, या भेटीमध्ये सध्या उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माजी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच 

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, पाकिस्तानकडून सातत्यानं हल्ल्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, मात्र भारताच्या डिफेंस सिस्टिममुळे पाकिस्तान वारंवार तोंडावर आपटत आहे, गुरुवारी देखील असाच पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला.