राफेल लढाऊ विमान आता ‘मेक इन इंडिया’, टाटा भारतात बनवणार मेन बॉडी
राफेल लढाऊ विमानाची मेन बॉडी आता भारतात तयार होणार आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्समध्ये महत्वाचा करार झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राफेल लढाऊ विमान आता भारतात बनवले जाणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स या कंपन्या आता भारतात राफेल लढाऊ विमानाचा मेन बॉडी तयार करणार आहेत. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये चार करार झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे फ्रान्सबाहेर राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग तयार होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. डसॉल्ट एव्हिएशनच्या मते, ही भारताच्या एरोस्पेस पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे, याचा फायदा भारतासह फ्रान्सलाही होणार आहे.
राफेलचा कोणता भाग भारतात बनवला जाणार?
समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स राफेलची मेन बॉडी बनवणार आहे. यासाठी टाटा कंपनी हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक प्लांट उभारणार आहे. यात फ्यूजलेजचे मागील कवच, संपूर्ण मागील भाग, मध्यभागी असलेले फ्यूजलेज आणि पुढचा काही भागही तयार केला जाणार आहे. राफेलचा पहिला मुख्य भाग आर्थिक वर्ष २०२८ मध्ये तयार होण्याची शक्यता आहे.
डसॉल्ट एव्हिएशनने दिली महत्वाची माहिती
डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी या कराराबाबत सांगितले की, आम्ही भारताला राफेल पुरवतो, मात्र आता भारतातच राफेलचा काही भाग तयार होणार आहे. भारतीय एरोस्पेस उद्योगातील महत्वाची कंपनी असलेल्या टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टमसोबतच्या करारामुळे राफेलला चांगला फायदा होणार आहे.
राफेलबाबत महत्वाची माहिती
- राफेल जेटच्या पंखांच्या लांबी – १०.९० मीटर
- राफेलची लांबी – १५.३० मीटर
- राफेलचीउंची – ५.३० मीटर
- राफेलची एकूण रिक्त वजन – १० टन
- जास्तीत जास्त टेक-ऑफ वजन क्षमता – २४.५ टन
- अंतर्गत इंधन क्षमता – ४.७ टन
- बाह्य इंधन क्षमता – ६.७ टन पर्यंत
राफेलमध्ये ५०,००० फूट उंचीवर उडण्याची क्षमता
राफेल हे जगातील एक आघाडीचे ट्विन-जेट लढाऊ विमान आहे. हे विमान विमानवाहू नौकांवरूनही उड्डाण करु शकते. राफेलमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. यात हवाई हल्ला करण्याची क्षमता आहे, तसेच या विमानावर झालेला जमीनीवरून झालेला हल्ला परतून लावण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे या लढाऊ विमानाला जगभरातून मोठी मागणी आहे.
