
ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवला आहे. त्यात असंख्य दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या ऑपरेशनवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांना मारलं, केवळ त्यांनाच आम्ही मारलं आहे. भारताने आपल्या भूमीत झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राईट टू रिस्पॉन्सचा वापर केला आहे. अतिरेक्यांचं अवसाळ गळावं म्हणून केवळ त्यांचे कॅम्प आणि मूलभूत सुविधांवरच आम्ही हल्ला चढवला आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
राजनाथ सिंह यांनी यावेळी हनुमानाचाही उल्लेख केला. अशोक वाटिका उजाडताना हनुमानाने जो आदर्श घालून दिला, त्याच आदर्शाचं आम्ही पालन केलं आहे. हनुमानाचा मंत्र आहे, जिन्ह मोहे मारा, तिन्हे मोई मारे… ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारलं, त्यांनाच आम्ही मारलं आहे. आम्ही या मंत्राचं तंतोतंत पालन केलं आहे, असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 50 बीआरोच्या योजनेचं उद्घाटन करताना राजनाथ सिंह बोलत होते.
भारती लष्कराने आपल्या अद्भूत शौर्याचा आदर्श घालून दिला आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनात आमच्या सैन्याने सर्व भारतीयांची मान उंचावली आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी सर्वांनी तीन वेळा भारत माता की जयचे नारेही दिले.
काल रात्री आपल्या सैन्याने अद्भूत शौर्याचं दर्शन घडवून नवीन इतिहास रचला आहे. भारतीय सैन्याने सतर्कता आणि संवेदनशीलतेच्यासह ही कारवाई केली आहे. टार्गेट फिक्स केले होते. त्यानंतर ठरलेल्या मुदतीत टार्गेट उद्ध्वस्त केलं. कोणत्याही प्रकारे नागरिकांना इजा होणार नाही, नागरी वस्तीचं नुकसान होणार नाही याची खबरदारी आपल्या सैन्याने घेत संवेदनशीलताही दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं.
एकप्रकारची सटिकता, सतर्कता आणि मानवता आपल्या जवानांनी दाखवली आहे. त्यामुळे मी आपल्या जवानांना आणि अधिकाऱ्यांचे आभार मानतो. तसेच पंतप्रधानांनाही साधुवाद देतो, असं ते म्हणाले. पंतप्रधानांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर लॉन्च करून पूर्वी प्रमाणेच अतिरेक्यांच्या कॅम्पला नेस्तनाबूत करण्यात आलं आहे. भारताने आपल्या भूमीत झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. अतिरेक्यांचं कंबरडं मोडण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.