देशात 22 जानेवारीसाठी अचानक वाढली दिव्यांची मागणी, दुप्पट किंमतीत ही मिळेनात
Ram mandir update : 22 जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. राम मंदिरासाठी शेकडो वर्षांपासूनचा हा संघर्ष संपल्यानंतर आता लोकांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण आहे. देशभरात या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे.

Ayodhya Ram Madnir : अयोध्येतील रामलल्लाचे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. हे भव्य मंदिर पाहण्यासाठी करोडो लोकांमध्ये उत्सूकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी काही खास लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी पुन्हा एकदा देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे. घरोघरी दिवे लावले जाणार असून यासाठी लोकांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी दिव्यांची मागणी अचानक वाढली आहे. दिवाळी नसतानाही देशभरात दिव्यांची मागणी वाढण्याचं ही पहिलीच वेळ आहे. बाजारात दिवे खरेदी करण्यासाठी लोकं दुप्पट पैसे देखील मोजत आहेत. मागणी जास्त असल्याने कामगारांना तेवढ्या जलद गतीने दिवे बनवणे कठीण झाले आहे.
बाजारात दिवे भेटत नसल्याने किंमती वाढल्या आहेत. दिव्यांची मागणी वाढणार असल्याने गेल्या महिनाभरापासून ऑर्डर मिळू लागल्या होत्या. पण तरी देखील मागणी इतका पुरवठा करणे शक्य होत नाहीये. कारण दिवाळीसाठी दिवे बनवण्याचं काम कुंभार सहा महिने आधीच सुरु करतात. त्यामुळे एका महिन्यात ते काम करणं शक्य नसल्याचं कुंभार सांगत आहेत. दिवे बनवल्यानंतर त्याला सूर्यप्रकाशात सुकायला वेळ लागतो. सध्या हिवाळा असल्याने सुर्यप्रकाश देखील कमी आहे.
माती देखील महागली
दिवे बनवणारे कुंभार प्रयत्न करत असले तरी देखील मागणी पूर्ण होणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. दिवे बनवण्यासाठी लागणारी चिकणमाती देखील महागली आहे. ही माती हरियाणातील बहादूरगड येथून आणली जाते.मातीचा देखील तुटवडा आहे. काळी माती देखील महाग मिळते, कारण ती तलावांमधून काढली जाते.
लाखो दिव्यांची ऑर्डर
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेकाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी विविध स्तरातून दिव्यांची मागणी वाढत आहे. काही मंदिरांकडून हजारो दिव्यांची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी लोकं शेकडो दिवे लावून हा दिवस साजरा करणार आहे. घराघरात दिवे लागवण्याचं आवाहन करण्यात आल्याने त्याला लोकांकडून उत्सूर्त प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे दिव्यांची मागणी वाढली आहे.
