मोठी बातमी! रशियानं मोठा धोका दिला? पुतिन भारत दौऱ्यावर असतानाच घडली मोठी घटना, भारताचं टेन्शन वाढलं

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर होते, यावेळी रशिया आणि भारतामध्ये अनेक करार झाले. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे भारताचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! रशियानं मोठा धोका दिला? पुतिन भारत दौऱ्यावर असतानाच घडली मोठी घटना, भारताचं टेन्शन वाढलं
व्लादिमीर पुतिन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 6:21 PM

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते, या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. पुतिन याचा हा भारत दौरा अनेक अर्थानं अत्यंत महत्त्वाचा होता. पुतिन यांच्या या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियादरम्यान अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, मात्र या दरम्यान पुतिन यांनी मोठी घोषणा केली, भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कमी पडू देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. हा अमेरिकेसाठी धक्का मानला जात आहे. मात्र आता भारताचं टेन्शन वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुतिन भारताच्या दौऱ्यावर असतानाच रशियानं चीनसोबत तिसरा संयुक्त क्षेपणास्त्रविरोधी सराव केला आहे. यादरम्यान दोन्ही देशांच्या युद्धनौकांनी आणि पाणबुड्यांनी जपानच्या समुद्रात शत्रूंचे मिसाईल पाडण्याचा सराव केला आहे. यासोबतच शत्रू राष्ट्रांच्या मिसाईल अस्थापनांना नष्ट करण्याचा सराव देखील करण्यात आला आहे.

याकडे एक महत्त्वाची घटना म्हणून पाहिलं जातं आहे. या घटनेला चीन आणि रशियामधील एक नवा संरक्षण अध्याय म्हणून पाहिलं जात आहे. ही घटना यासाठी देखील महत्त्वाची मानली जात आहे की, पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर असतानाच रशियानं चीनसोबत हा युद्धसराव केला आहे. चीन हा भारताचा जुना शत्रू आहे, अशा परिस्थितीमध्ये पुतिन भारताच्या दौऱ्यावर असाताना रशियानं चीनसोबत युद्ध सराव केल्यामुळे याकडे दोन्ही देशांमध्ये संतुलन साधण्याची रणनिती म्हणून पाहिलं जातं आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचा खुलासा

चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून शनिवारी रात्री याबाबत खुलासा करण्यात आला आहे. रशियासोबत चीनने युद्धसराव केला आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आम्ही हा युद्धसराव कोणत्याही तिसऱ्या देशाला टारगेट करण्यासाठी केला नसून, सध्या जागतिक स्थरावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ते डोळ्यासमोर ठेवून हा सराव करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांदरम्यान मिसाईल डिफेन्स सारख्या महत्त्वाच्या विषयावर देखील चर्चा सुरू आहे, असं चीनने म्हटलं आहे.

भारताचं टेन्शन वाढणार

दरम्यान रशियाकडून देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की, या युद्ध सरावाचा रशियाच्या भारतासोबत असलेल्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, मात्र सध्या जरी अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारताची चीनसोबत जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळत असलं तरी देखील दीर्घकालीन धोरण पहाता अशाप्रकारचे युद्धसराव भारतासाठी अडचणीचे ठरू शकतात असं बोललं जात आहे.