
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं, दोन्ही देशांसाठी ही भेट महत्त्वाची होती. पुतिन भारत दौऱ्यावर असताना रशिया आणि भारतामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. या भेटीमुळे अमेरिकेची डोकेदुखी चांगलीच वाढली, रशिया आणि भारतामध्ये असलेली जवळीक आणखी वाढू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे. तसेच आपल्या या दौऱ्यामध्ये पुतिन यांनी एक मोठी घोषणा देखील केली होती. भारताला कधीही कच्च्या तेलाचा पुरवठा कमी पडू देणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं, अमेरिकेनं या मुद्द्यावर भारतावर टॅरिफ लावला आहे, त्यामुळे पुतिन यांच्या घोषणेमुळे अमेरिकेचा चांगलाच जळफळाट झाला. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियाचे कॅन्सूल जनरल व्हॅलेरी खोजेव यांनी मोठी घोषणा केली आहे, ते चेन्नईमध्ये बोलत होते.
रशिया लवकरच बहुप्रतिक्षित चेन्नई -व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर (EMC) सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पावर रशियाकडून काम सुरू झालं आहे, भारतासोबत व्यापार आणि आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी हा प्रकल्प आम्हाला धोरणात्मकरित्या खूप महत्त्वाचा वाटतो असंही यावेळी व्हॅलेरी खोजेव यांनी म्हटलं आहे. हा प्रस्तावित समुद्री मार्ग भारताच्या पू्र्व किनाऱ्याला रशियाच्या सुदूर पूर्व किनाऱ्याला जोडेल, हा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा कॉरिडॉर असणार आहे, ज्याद्वारे भारत आणि रशियाच्या भविष्याला एक नवी गती मिळेल, आणि व्यापार अधिक गतिमान होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
हा मार्ग का महत्त्वाचा?
हा मार्ग दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या मार्गामुळे रशिया आणि भारत या दोन्ही देशादरम्यान प्रवास करायचा असेल तर सध्या 40 दिवस लागतात, मात्र हा कॉरिडॉर झाल्यानंतर हे अतंर कमी होऊन ते अवघ्या 20 ते 22 दिवसांवर येणार आहे, त्यामुळे रशिया आणि भारतमधील आयात -निर्यातीला चालना मिळून व्यापार वाढणार आहे, रशिया आणि भारताची जवळीक यामुळे आणखी वाढू शकते.