
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वीच भारताचा दौरा केला होता, पुतिन यांच्या या दौऱ्याकडे अमेरिकेसह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. पुतिन यांच्या या भारत दौऱ्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा मोठा अपमान केला आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबादमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, या परिषदेमध्ये जगभरातील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे देखील सहभागी झाले आहेत. या दरम्यान अनेक देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय बैठका देखील केल्या, याचाच एक भाग म्हणून पुतिन आणि शरीफ यांची द्विपक्षीय बैठक होणार होती.
या बैठकीसाठी शहबाज शरीफ आपल्या ठरलेल्या वेळेत बैठकीच्या ठिकाणी पोहोचले, ते जवळपास 40 मिनिटं त्या ठिकाणी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांची वाट पाहात थांबले, मात्र पुतिन यांनी शरीफ यांची भेट घेतलीच नाही, ते तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप यांच्यासोबत एका बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे पुतिन यांनी शरीफ यांची भेट घेतलीच नाही, अखेर 40 मिनिटांनंतर शरीफ हे बैठकीच्या नियोजित स्थळावरून बाहेर पडले, यावेळी त्यांचा चेहरा उतरलेला दिसत होता. कारण या बैठकीमध्ये शरीफ हे पुतिन यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार होते.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच पुतिन हे भारत दौऱ्यावर होते, पुतिन यांच्या या दौऱ्यावेळी भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. रशिया भारताला कधीही कच्चे तेल कमी पडू देणार नाही अशी घोषणा पुतिन यांनी आपल्या या दौऱ्यात केली आहे, हा पुतिन यांचा अमेरिकेसाठी मोठा झटका मानला जात आहे. एकीकडे पुतिन यांनी भारत दौरा केला, मात्र दुसरीकडे ते साधे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटले सुद्धा नाहीत, त्यामुळे आता पाकिस्तानचा जळफळाट आणखी वाढण्याची शक्यता आहे.