
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांना आपली जीव गमवावा लागला आहे. पूर्वांचल एक्सप्रेसवेवर झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात एका कारला दुसऱ्या कारने धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांनी लगेच पेट घेतला. या आगीमुळे आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही. आतील 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आझमगडमधील अत्रौला पोलिस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल अशरफ जावेद यांच्या कुटुंबातील सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये अशरफ जावेद दिवाण यांची पत्नी गुलिस्ता चांदनी, मुली इस्मा, समरीन, इल्मा आणि मुलगा जियान यांची समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह वाराणसीतील लोहटा येथील रहिमपूर शहरातील त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह धनीपूर स्मशानभूमीत दफन करण्यात आले.
या घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या पाचही जणांच्या अंतयात्र एकत्र निघाली होती. हे दृष्य पाहून नातेवाईक आणि स्थानिकांच्या अंगावर काटा आला. 54 वर्षीय सब्बू मियाँ हे आझमगढहून अंत्यसंस्कारासाठी आले होते. अशरफ जावेद आणि सब्बू मियाँ यांच्या कुटुंबात चांगले संबंध होते. कुटुंबातील लोकांच्या मृत्यूमुळे अशरफ यांना मोठ्याने रडताना पाहून सब्बूला खूप दुःख झाले.
स्मशानभूमीत मृतदेह पुरत असताना सब्बू मियाँ यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध पडले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितले. मित्राला बसलेला धक्का सहन न झाल्याने सब्बूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्यामुळे उपस्थितांना आणखी एक धक्का बसला.
समोर आलेल्या माहितीनुसार अशरफ यांच्या कुटुंबाचा अपघात हैदरगढ पोलिस स्टेशन परिसरातील दीह गावाजवळ झाला. एक ब्रेझा कार वेगाने आली आनि पार्क केलेल्या वॅगन आर कारला धडकली. यामुळे दोन्ही गाड्यांना आग लागली. या अपघातात अशरफचे संपूर्ण कुटुंब जिवंत जळाले. अपघातानंतर वॅगन आर कारचे दरवाजे लॉक झाले गाडीतील लोक मदतीसाठी याचना करत होतेस मात्र आगीच्या ज्वाळांमुळे कुणीही मदत करू शकले नाही.