सौरव दास, आशुतोष रांका यांना अटक, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; थेट संघालाच आवाहन
जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्याने सौरव दास व आशुतोष रांका यांना अटक झाल्यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) राष्ट्रभक्तीवर प्रश्न विचारला. राऊत यांनी या अटकेला घुसखोरांचे सरकार म्हटले असून, अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.

जंतरमंतरवर तिरंगा फडकवला म्हणून कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आमि आशुतोष रांका यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसाच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच राष्ट्रभक्ती, वंदे मातरमचं गुणगाण गाणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता कुठे आहे?असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.
जंतरमंतरला आंदोलन केलं म्हणून आशुतोष आणि सौरवला अटक केली. तिरंगा फडकवल्याबद्दल अटक केली असेल तर हे सरकार घुसखोरांचं सरकार आहे, ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार आहे, असंच म्हणावं लागेल. आता कुठे आहे संघ? वंदे मातरम आणि तिरंग्यासाठी आंदोलन करणारा संघ कुठे आहे? स्वतंत्र भारतात तीन तरुणांना अटक झाली असेल तर अमित शाह यांनी समोर येऊन बोललं पाहिजे. तिरंगा फडकवल्याबद्दल तुरुंगवास होतोय, हे लक्षात घ्या. अमित शाह यावर बोला. नंतर भूमिगत होऊ नका, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.
शिंदेंना धर्म काय माहीत?
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तांडव विधानावरही टीका केली. शिवाचं तांडवही बंड होतं. शिंदेंना धर्म माहीत नाही. शिवाने जगातील पृथ्वीवरचा संताप व्यक्त केला ते तांडव आहे. शिंदेंना सांगा वेद, पुराण वाचा. नागपूरला जाऊन बसा. तिसरा डोळा उघडणार म्हणे. तुमच्या बॉसला अमित शाहांना लाखोची गर्दी दिसत नाही. तिसरा डोळा उघडणार म्हणे. त्यांना एक डोळा बसवा. तिसऱ्या डोळ्याचं काय? तिसरा डोळा… चौथा डोळा… डोळा काय आमदार, खासदार आहे का विकत घ्यायला? अशी खोचक टीकाही राऊत यांनी केली.
रामलिलेवर मॉक पार्लमेंट
दरम्यान, वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतल्याचं राऊत म्हणाले. सण उत्सव असल्याने आंदोलनाबाबत काल आमची चर्चा झाली. संघर्ष थांबणार नाही. आंदोलनाचे प्रकार बदलतील. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होईल. प्रत्येकवेळी मोर्चाच काढला जाईल, असं नाही. रस्त्यावरच उतरलं जाईल असं नाही. आमची स्ट्रॅटेजी ठरली आहे. उत्सव आहेत. सण आहेत. लोकांना बाजारहाट करायला बाहेर जायचं आहे. आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोही आंदोलनाचा भाग आहे. रामलिला मैदानात मॉक संसद करणार आहोत. लोकांना या विषयाचं गांभीर्य समजून सांगितलं जाईल. हा ज्ञानेश कुमार एक दिवस जाईल. तो माफिया आहे. ज्ञानेश कुमारला जावं लागेल हे अमित शाह यांनाही माहीत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
