नक्षली चळवळ खिळखिळी, 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान, टॉपचा नेताही संपला!
सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये झालेल्या या चकमकीत 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यालाही ठार करण्यात आले आहे.

Attack ON Naxal : छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण याचाही समावेश आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी बुधवारपासून आपले हे ऑपरेशन चालू केले होते. गरियाबंद भागात काही नक्षली लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे नक्षल संपवण्याच्या मोहिमेला आणखी बळ मिळाल्याचे म्हटले जात आहे.
सुरक्षा दलांना मिळाली होती गुप्त माहिती
गरियाबंदमध्ये मोहीम राबवल्यानंतर याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांनी दिली. या माहितीनुसार सुरक्षा दलाला नक्षलवाद्यांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर बुधवारी लपलेल्या नक्षल्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. यात मोडेम बालकृष्ण याच्यासोबत एकूण 10 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. मोडेम बालकृष्ण याच्यावर एक कोटी रुपयांच्या बक्षीस होते.
मोडेम बालकृष्ण याचाही खात्मा
मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमेत छत्तीसगडचे पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, कोबरा बटालीयन आदी सामील होते. या मोहिमेत ठाक करण्यात आलेला मोडेम बालकृष्ण हा ओडिसा राज्य समितीचा (OSC) वरिष्ठ सदस्य होता. गरियाबंद हा नेहमीच नक्षलवाद्यांचा गड राहिलेला आहे. इथे नेहमी नक्षल्यांच्या कारवाया होत असत. याच भागात अनेकदा सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झालेली आहे.
मोडेम बालकृष्ण कोण होता?
मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण हा नक्षलवादी संघटनेतील एक वरिष्ठ नेता होता. त्याच्याविरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप होते. यात हत्या, लूटमार, पोलिसांवर हल्ला करणे यासारख्या आरोपांचा समावेश होता. म्हणूनच त्याच्या कारवाया लक्षात घेता त्याला पकडून देणाऱ्याला किंवा त्याची माहिती देणाऱ्याला तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून नक्षलवादाला समूळ नष्ट करण्यासाठी सुरक्षा दल आक्रमक झाले आहेत. या काळात अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करून ही चळवळ सोडली आहे. बरेच नक्षलवादी मुख्य प्रवाहात आलेले आहेत. त्यानंतर आता गरियाबंदमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मिळालेल्या या यशमाुळे नक्षली चळवळ खिळखिळी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
