
राजधानी दिल्लीत बुधवारची संध्याकाळ राजकीय दृष्टया खूप खास होती. राष्ट्रवादी SP पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षीय विचारधारा बाजूला ठेऊन अनेक नेते डिनरसाठी जमले होते. या डिनर कार्यक्रमात देशातील प्रमुख उद्योगपती सुद्धा दिसले. शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या बरोबर एकदिवस आधी हा डिनर कार्यक्रम झाला. हा पूर्णपणे खासगी सोहळा होता. शरद पवार देशाच्या राजकारणातील एक दिग्गज नेते आहेत. दीर्घकाळापासून ते राजकारणात आहेत. या कार्यक्रमाला जे उपस्थित होते, त्यामुळे हा डिनर सोहळा खास झाला.
या डिनर कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा सहभागी झाले होते. सर्वात जास्त लक्ष उद्योगपती गौतम अदानी यांनी वेधून घेतलं. दिल्लीत आणि महाराष्ट्रात शरद पवार यांचे मित्र पक्ष सातत्याने अदानी यांचं नाव घेऊन सरकारला धारेवर धरतात. त्यामुळे गौतम अदानी यांची उपस्थित लक्षवेधी ठरली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात चांगले मित्रत्वाचे संबंध आहेत. यापूर्वी सुद्धा गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.
अजून कोण-कोण हजर होतं?
त्याशिवाय तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सुद्धा सहभागी झाले होते. तेलंगणमध्ये सरकार बनल्यानंतर अशा कुठल्या राजकीय कार्यक्रमात दिसण्याची रेड्डी यांची ही पहिली वेळ होती. खासबाब म्हणजे शरद पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या डिनरला हजर होते. अजित पवार यांच्या सहभागावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली, भले राजकीय मतभेद कितीही असले, तरी व्यक्तिगत संबंध राजकारणापलीकडे आहेत.
त्यामुळे सर्वपक्षीयांमध्ये त्यांना आदराचं स्थान
शरद पवार सहादशकापासून अधिक काळ राजकारणात आहेत. पक्षापलीकडे अनेक नेत्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद, संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री अशी अनेक महत्वाची पद भूषवली आहेत. पवारांनी त्यांची प्रशासकीय क्षमता दाखवून दिली. वेळोवेळी त्यांनी जी राजकीय समज दाखवली, त्यामुळे सर्वपक्षीयांमध्ये त्यांना आदराचं स्थान आहे.