शरद पवारांची डिनर डिप्लोमसी, अजितदादांना निमंत्रण, थेट फोन करून…पडद्यामागे काहीतरी घडतंय?
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन कॉल केला आहे. अजित पवार शरद पवार यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sharad Pawar Ajit Pawar Meeting : राज्यात महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घडामोडींना चांगलाच वेग आला असून युती आणि आघाडीच्या राजकारणावर भर दिला जात आहे. सध्या राज्यात दोन वेगवेगळे राष्ट्रवादी पक्ष आहेत. परंतु हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची याआधी अनेकदा चर्चा झाली आहे. खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकत्र आल्याचेही पाहायला मिळालेले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अजितदादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. असे असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेत प्रफुल्ल पटेल यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?
मिळालेल्या माहितीनुसार खासदर शरद पवार यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शरद पवार यांनी स्वत:च हे निमंत्रण दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना फोन
शरद पवार यांचा दोन दिवसांनी वाढदिवस आहे. याच वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना तसेच नेत्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिलेले आहे. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेही काही नेते आहेत. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना स्वत: फोन केला आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल हे स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारदेखील या स्नेहभोजनाला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही भेट फक्त स्नेहभोजनाची?
दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीचे सर्व खासदार, नेते तसेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल एकत्र येण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. ही फक्त स्नेहभोजनाचीच भेट आहे, असे अजित पवार यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात काय-काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
