Shiv Sena Case Hearing : ज्यांनी घटनात्मक पाप केले… न्यायामूर्ती बागची यांचं मोठं विधान; शिंदे की ठाकरे? कुणाची अडचण?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणीत न्यायमूर्ती बागचींच्या 'घटनात्मक पाप' विधानाने खळबळ उडवली आहे. त्यांनी 'पाप' करणाऱ्यांना की तक्रारदारांना पक्षचिन्ह मिळेल, असा सवाल केला. बहुमताचे निकष ठरवणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे निरीक्षण शिंदे की ठाकरे, कुणाच्या बाजूने जाईल याबाबत उत्सुकता आहे.

प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह यावर सुनावणी सुरू आहे. आजही शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांनी प्रश्नांची सरबती केली. ज्यांनी घटनात्मक पाप केले त्यांच्यासाठी पक्ष चिन्हाचे महत्त्व लागू होईल की ज्यांनी त्या घटनात्मक पापाविरोधात तक्रारी केली त्यांच्यासाठी?, असा सवाल बागची यांनी केला. बागची यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर कशा पद्धतीने विचार करत आहे, याचे संकेतही मिळत आहेत. त्यामुळेच शिंदे की ठाकरे? कुणाच्या पथ्यावर हा निकाल पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात नीरज कौल यांनी युक्तिवाद सुरू केल्यानंतर न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांनीही काही सवाल केले. बागची यांचा पहिला सवाल अत्यंत महत्त्वाचा होता. जेव्हा अपात्र सदस्य पक्षातून बाहेर जातात, तेव्हा इतर सदस्यांना वेगळे चिन्ह मिळते. मग अशावेळी चिन्हाचा अधिकार कुणाला हवा? असा थेट सवालच बागची यांनी कौल यांना केला. त्यानंतर त्यांनी पक्ष चिन्हाचे महत्त्व कुणाला लागू होईल? ज्यांनी घटनात्मक पाप केले त्यांना की ज्यांनी या पापाविरोधात तक्रार केली त्यांना? असा सवालही त्यांनी केला.
बहुमत ठरवणं कठिण
पक्षाच्या बहुमतावरूनही त्यांनी आपलं निरीक्षण नोंदवलं. कितीही जाणकार निवडणूक आयोग असला तरी पक्षात बहुमत कुणाकडे ठेवायचे हे त्यांना ठरवणं कठिण आहे. पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांची संख्या मोजून लोकशाही पद्धतीने निर्णय घेणं अशक्य असतं. अशावेळी बहुमत कसे ठरवणार? असा सवालही बागची यांनी केला.
तो निकष योग्य होता
पक्ष फुटल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळावेळी विधानमंडळातील पक्ष ही संकल्पना चांगली होती. तो निकष योग्य होता. मात्र, अपात्रतेचा प्रश्न समोर आल्यावर तोच निकष कसा लावायचा? असही त्यांनी विचारलं.
राणा खटल्याचा अर्थ चुकीचा
यावेळी नीरज कौल यांनीही युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी राणा केस आणि सुभाष देसाई खटल्याचा संदर्भ दिला. आधी फूट आणि नंतर अपात्रता असा क्रम लावता येणार नाही. राणा खटल्याचा अर्थ चुकीचा लावला जात आहे. राणा खटल्याचा संदर्भ त्या विशिष्ट परिस्थिती पुरताच मर्यादित होता. त्यामुळे या प्रकरणाला राणा खटल्याचा संदर्भ देता येणार नाही, असं नीरज कौल म्हणाले.