अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडांचा वर्षाव; काय घडले दिल्ली विधानसभेचा निवडणूक प्रचारात, मुद्दावरून थेट गुद्दावर

Delhi Vidhansabha Election 2025 Stone Pelting : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर निवडणुकीच्या रणधुमाळीत हल्ला झाला आहे. अर्थात केजरीवालांनी भाजपाकडे बोट दाखवले आहे. विटा आणि दगड भिरकावल्याचा आरोप होत आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडांचा वर्षाव; काय घडले दिल्ली विधानसभेचा निवडणूक प्रचारात, मुद्दावरून थेट गुद्दावर
केजरीवाल यांच्या ताफ्यावर दगडफेक
| Updated on: Jan 18, 2025 | 6:11 PM

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हातून दिल्ली काढून घेण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा केंद्रीय सत्तेत आले आहे. पण मुख्य राजधानीत त्यांना जम बसवता आलेला नाही. आता प्रचार मुद्दावरून थेट गुद्दावर आला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. तर दुसरीकडे भाजपाने केजरीवाल यांच्या कारने दोन तरुणांना चिरडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आरोपांच्या फैरी

दिल्ली निवडणूक प्रचारात सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शनिवारी आपने भाजपावर गंभीर आरोप लावला. भाजपा नेते परवेश वर्मा यांनी गुंडांच्या मदतीने अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर दगड आणि विटा भिरकावल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत लढाई आता मुद्दावरुन गुद्दावर आल्याचे दिसून येत आहे. यावेळी आप आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीच नाही तर हाणामारी झाली. दोघांनी त्यांच्या पक्षाच्या बाजूने दावे करत एकमेकांवर आरोप लावले आहेत.

व्हायरल व्हिडिओत काय?

आम आदमी पार्टीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाजपा दिल्लीतील पराभवाच्या भीतीने हे कृत्य करत असल्याचा आरोप आपने केला आहे. भाजपाने गुंडांच्या मदतीने केजरीवाल यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप पक्षाने केला आहे. यामध्ये त्यांनी परवेश वर्मा या भाजप नेत्याचे नाव घेतले आहे. दगड आणि विटांच्या मदतीने हा हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अशा हल्ल्याला आप भीक घालत नाही. आम्ही अधिक जोमाने प्रचारात उतरणार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. तर दिल्लीतील जनता हे सर्व पाहत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

हल्ला झाला नसल्याचा पोलिसांचा दावा

तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या सूत्रानुसार, हल्ल्याचे वृत्त सपशेल खोटं आहे. दोन्ही पक्षात नारेबाजी सुरू होती. गोल मार्केट परिसरात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जमले. ते एकमेकांची वाहनं अडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला. पण नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत आहे.