
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. आता अमेरिकेनं इराणविरोधात थेट युद्धाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि हल्ला झाला तर बचावासाठी इराणकडून मध्य पूर्वेत टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स, बॅटरी आणि पॅट्रियट डिफेन्स सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. इराणकडून अमेरिकेला थेट इशारा देखील देण्यात आला आहे, जर आमच्यावर हल्ला झाला तर मध्यपूर्वेमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सर्व सैन्य स्थानांवर आम्ही हल्ला करू असं इराणने म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं मात्र इराणच्या या धमकीला न जुमानता सैन्याच्या बळकटीकरणास सुरुवात केली आहे. अमेरिका कुवैत, सौदी अरेबिया आणि कतारमध्ये असलेले आपली सैन्य संख्या वाढवत आहे. तसेच सुरक्षिततेसाठी इतर देखील काही उपाय योजना अमेरिकेकडून सुरू आहेत. दरम्यान मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम हा भारतावर देखील होऊ शकतो, भारत देखील संकटात सापडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकतं, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मात्र इराणकडून अमेरिकेला थेट इशारा देण्यात आला आहे, आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य तळांवर थेट हल्ला करू, इराणने त्यादृष्टीने तयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र आता अमेरिका मध्यपूर्वेत असलेली आपली सैन्य शक्ती आणखी वाढवण्याच्या तैयारीमध्ये आहे. अमेरिकेकडून मध्यपूर्वेत नौदल देखील तैनात करण्यात आलं आहे. त्यामुळे आता मध्यपूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला असून, याचा थेट फटका हा भारतला बसणार आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
मध्यपूर्वेत जर तणाव वाढला तर त्याचा थेट फटका हा भारताला बसू शकतो, असं मत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भारतावर मोठं ऊर्जा संकट येऊ शकतं, कारण जानेवारी 2025 च्या आकडेवारीनुसार भारत जवळपास आपल्या गरजेच्या 53.89 टक्के इतकं तेल मध्यपूर्वेतून आयात करतो. त्यामुळे जर मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला, किंवा अमेरिका-इराण युद्ध सुरू झालं तर त्याचा परिणाम हा थेट भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर होणार आहे, भारातमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव देखील प्रचंड प्रमाणात वाढू शकतात.