आमदारांना कार, इंधन, ड्राइव्हरसाठी दरमहा 75000 रुपये..; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यात कार, ड्राइव्हर, इंधन, भत्त, सेक्रेटरीसाठी अनुदान यांचा समावेश आहे. सरकारी वाहनामुळे शासन पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांनी राज्यातील आमदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील सर्व 234 आमदारांना सरकारी वाहन उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यामध्ये कार, इंधन भत्ता आणि सेक्रेटरीचा समावेश आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आमदारांना वारंवार प्रवास करावा लागतो, त्यामुळे या सुविधा देण्यात येत असल्याचं विजय यांनी विधानसभेत सांगितलं.
तमिळनाडूतील प्रत्येक आमदाराला सरकारी वाहनासोबतच ड्राइव्हर, इंध आणि वाहनाच्या देखभालीसाठी दरमहा 75 रुपयांचा भत्ता मिळणार आहे. याशिवाय अधिकृत कामकाजासाठी सेक्रेटरी नियुक्त करण्यासाठी आमदारांना दरमहा 25 हजार रुपयांचं अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या आमदारांना या सुविधांचा फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे. “लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आमदारांना त्यांच्या मतदारसंघात वारंवार प्रवास करावा लागतो. सरकारी वाहनामुळे शासन पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त होईल”, असं विजय म्हणाले.
या निर्णयाचं समर्थन करताना विजय म्हणाले, “सर्व आमदारांना लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि सरकारी प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी आपापल्या मतदारसंघात प्रवास करणं आवश्यक असतं. आर्थिक पाठबळ नसलेल्या आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्यांना त्यांची जबाबदारी अविरतपणे पार पाडण्यास मदत व्हावी, यासाठी सर्व आमदारांना शासकीय वाहनं जाहीर करताना मला आनंद होत आहे.”
आमदारांना गाड्या देण्याच्या या निर्णयाचं स्वागत करताना टीव्हीकेच्या आमदार सबरी अयंगरण यांनी स्वत:चा अनुभव सांगितला. “माझ्याकडे ना गाडी होती, ना नोकरी. पण आता आमच्या नेत्याने आम्हाला नोकऱ्या आणि गाड्या दोन्हीही दिल्या आहेत. मी चेन्नईला ट्रेनने प्रवास करून येते. जेव्हा मी विधानसभेत ऑटोने प्रवास करून येते, तेव्हा मी आमदार आहे असं सांगितल्यावर पोलीसही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मला माझं ओळखपत्र दाखवावं लागतं”, असं त्या म्हणाल्या. तर टीव्हीकेच्या आमदार सिंधू यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी विधानसभेत एमजीआर यांचं एक गाणं सादर केलं, तेव्हा थलपती विजय यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
दुसरीकडे विरोधी पक्ष डीएमकेनं विजय यांच्या या घोषणेवर टीका करत हा अनावश्यक खर्च असल्याचं म्हटलं आहे. “यासाठी खूप पैसा लागेल. सर्व 234 आमदारांसाठी गाडीचा मोठा खर्च येईल आणि त्यानंतर अतिरिक्त भत्तेही जाहीर करण्यात आले आहेत. याची काय गरज होती”, असा सवाल डीएमकेचे प्रवक्ते ए. सरवनन यांनी केला आहे.