बापरे ! या ठिकाणी 50 अंशाच्या वर गेलं तापमान, लोकांना घराबाहेर पडणं ही झालं कठीण
देशात उष्णतेची लाट पसरली आहे. काही भागात पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी इतर भागात उष्णता रेकॉर्ड मोडत आहे. महाराष्ट्रातील अकोल्यात तापमान वाढल्याने कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दुसरीकडे एक असं ठिकाण आहे जिथे तापमान तब्बल ५० अशांवर गेले आहे.

भारतीय हवामान खात्याने अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहिल असं म्हटले आहे. बऱ्याच राज्यांमध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. लोकांना आता पावसाची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे राजस्थानच्या अनेक भागात तापमान वाढलं आहे. त्यामुळे प्रचंड उष्णतेमुळे लोकं त्रस्त झाले आहेत. राजस्थानमधील फलोदीचे तापमान तर 2016 चा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये येथील तापमान 51 अंशांवर पोहोचले होते. राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. उन्हाळ्याची स्थिती अशी आहे की सामान्यतः थंड असलेल्या रात्रीही उष्णतेच्या झळा बसत आहेत.
भयंकर उष्णतेचा तडाखा
राजस्थानला पुन्हा एकदा भयंकर उष्णतेचा तडाखा बसला आहे. माउंट अबू वगळता संपूर्ण राज्याचे तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले आहे. माउंट अबूमध्ये कमाल तापमान 34.8 अंश आहे, तर राजस्थानच्या उर्वरित भागात उष्णतेचा कहर सुरू आहे. राजस्थानमध्ये सामान्यतः दिवस उष्ण आणि रात्री थंड वातावरण असतं. परंतु यावेळी रात्री देखील उष्ण तापमान दिसत आहे. रात्रीच्या वेळीही उष्णतेची लाट जाणवत आहे.
फलोदीचे तापमान 50 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे येथील तापमान 2016 चा विक्रम मोडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 2016 मध्ये फलोदी येथे 51 अंश तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाचे संचालक राधेश्याम शर्मा यांनी सांगितले की, 2016 मध्ये फलोदी येथे सर्वाधिक 51 अंश तापमानाची नोंद झाली होती. यंदाही येथील तापमान राज्यातील सर्वाधिक असून गेल्या चार दिवसांत अनेकवेळा 50 अंशांवर पोहोचले आहे.
राजस्थानमध्ये चिंता वाढली
राजस्थानमध्ये वाढते असलेले तापमान चिंतेचे कारण बनले आहे. वाढत्या उष्णतेचा सामान्य जीवनावर परिणाम होत आहे. सरकारसमोर यामुळे देखील मोठे आव्हान उभे आहे. उष्णतेची लाट टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची सूचना हवामान खात्याने केली आहे. लोकांना उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. लोकांनी दुपारी बाहेर पडू नये म्हणून आवाहन केले जात आहे. उष्णतेमुळे बिघडत असलेल्या या परिस्थितीत नागरिकांना विशेष सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी भरपूर पाणी पिण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता
मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईत लोकं उष्णतेने त्रस्त आहेत. रात्री पण गरम होत असल्याने पावसाची प्रतिक्षा आहे. रविवारी मुंबईत कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९.४ अंश सेल्सिअस होते.
अकोला सर्वाधिक उष्ण शहर
अकोला जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले आहे. अकोल्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता पाहता जिल्हादंडाधिकारी यांनी शनिवारी 31 मे पर्यंत कलम 144 लागू केले होते. शुक्रवारी अकोल्यातील कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअस तर शनिवारी ४५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.
