हा वेल म्हणजे सापांचं दुसरं घरच; रात्री हमखास साप येतात, तुमच्याही घराजवळ आहे का?
साप हा नुसता शब्द जरी ऐकला तरी अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. कारण आपल्या मनात सापांबद्दल पक्की भीती बसलेली असते. त्याला आपल्या मनात सापांबद्दल निर्माण झालेले काही गैरसमज देखील कारणीभूत असतात. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास सापांना भिण्याचं काही कारण नाही.

भारताला विपुल प्रमाणात जैवविविधता लाभलेली आहे. इथे हजारो प्रकारच्या परिसंस्था आहेत, या प्रत्येक परिसंस्थांमध्ये लाखो प्रकारचे प्राणी आढळून येतात. प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. त्यामुळे इथल्या प्रत्येक जीवाचं निसर्गाच्या संतुलनामध्ये फार मोठं योगदान असतं. यातील एखादा घटक जरी वाढला किंवा कमी झाला तर तेथील परिसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. साप हा देखील निसर्गातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सापांना शेतकर्यांचा मित्र म्हटलं जातं, कारण जिथे सापांची संख्या अधिक असते, तिथे उंदरांची संख्या नियंत्रणात राहते, उंदरांपासून पिकांचं संरक्षण होतं, पिकांची नासाडी होत नाही आणि शेतकऱ्यांची मदत होते. त्यामुळेच सापांना शेतकर्यांचा खरा मित्र मानलं जातं. जिथे-जिथे सापांची संख्या कमी आहे, त्या भागात उंदरांची संख्या आपोआप वाढते, साप हा उंदरांवर नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण ठेवण्याचं काम करतो.
भारताचा विचार करायचा झाल्यास भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, त्यातील सर्वच सापांच्या प्रजाती या काही विषारी नाहीत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, घोणस, फुरसे आणि नाग या चार प्रमुख प्रजातींचा समावेश होतो. याला बीग फोर असं देखील म्हटलं जातं. जर समजा तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, ते सापांना पकडून सुरक्षित जागी सोडतील. मात्र तुम्ही चुकूनही सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.
दरम्यान काही अशी झाडं आणि वेल वर्गीय वनस्पती देखील असतात, ज्याकडे साप आपोआप आकर्षित होतात. त्यापैकीच एक वनस्पती आहे ती म्हणजे नागिणीच्या पानाचा वेल, ज्याला आपण विड्याच्या पानाचा वेल असं देखील म्हणतो. या वेलाची नैसर्गिक रचनाच अशी असते की साप या वेलाकडे आपोआप आकर्षित होतो. विशेष: रात्रीच्या वेळी साप या परिसरात आढळून येतात. या वेलाला पाणी जास्त लागतं, त्यामुळे या ठिकाणी कायम ओल असते. या ओलीमुळे या ठिकाणी बेडूक, उंदीर मोठ्या प्रमाणात येतात. सहज शिकार मिळत असल्यामुळे साप देखील या वेलाच्या अवती भोवती अनेकदा आढळून येतात.
