जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीतच राजकीय संघर्ष! रक्षा खडसेंच्या अर्जावर शिंदेसेनेची हरकत, खडसेंनीही डाव टाकला
Jalgaon District Bank Election News: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेत कुरघोडी दिसून येत आहेत. रक्षा खडसे, संजय पवारांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यानच तापू लागले आहे. बँकेच्या 21 जागांसाठी तब्बल 402 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज झालेल्या छाननी प्रक्रियेदरम्यान विविध उमेदवारांच्या अर्जांवर नऊ जणांनी हरकती घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जांवर हरकती घेतल्याने दोन्ही पक्षांमधील राजकीय कुरघोडीची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीच्या उमेदवारी अर्जावरही हरकत नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पवार कुटुंबाच्या उमेदवारीबाबत छाननीत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी हरकत घेतली आहे.
तर मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या तिन्ही उमेदवारांच्या अर्जांवर रक्षा खडसे यांनी हरकत नोंदवली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी 402 अर्ज दाखल झाल्याने सुरुवातीपासूनच निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मात्र, छाननीच्या टप्प्यावरच एकमेकांच्या उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्याच्या प्रकारामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
या हरकतींमुळे काही उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे पुढील गणितही छाननीच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर वैध आणि बाद ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी उद्या दुपारी 12 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे कोणाचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे अर्ज बाद होतात, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी हरकतींवर काय निर्णय देतात, याकडे सर्व उमेदवारांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. एकूणच मतदानापूर्वीच अर्जांच्या छाननीत भाजप आणि शिंदे सेनेत रंगलेली ही कुरघोडी जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवे राजकीय वळण देणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
