दिल्लीमध्ये पुन्हा आंदोलनाची शक्यता! गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय; सीजेपीचं टेन्शन वाढलं
Delhi Protest CAPF Security News: केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीतील सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कॉकरोच जनता पक्षाचं टेन्शन वाढलं आहे.

दिल्लीत पुन्हा आंदोलनाचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासन आधीच अलर्ट मोडवर आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत संभाव्य आंदोलनांची शक्यता असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सीजेपीचेही टेन्शन वाढले आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने राजधानीतील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २७३ कंपन्यांची तैनाती ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कॉकरोच जनता पक्षाने दिल्लीत आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर या कंपन्यांना दिल्लीत आणण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या तैनातीची मुदत आता वाढवण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलीस आणि संबंधित केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना २२ ऑक्टोबर रोजी या तैनातीमध्ये समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीतील आंदोलनांमुळे दिल्ली पोलिसांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तैनाती २० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याची विनंती केली होती. याला प्रतिसाद म्हणून दिल्ली पोलिसांनी गृह मंत्रालयाला एक पत्र पाठवले. या पत्राद्वारे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २७३ कंपन्यांची तैनाती मुदतीनंतरही सुरू ठेवण्याची परवानगी मागण्यात आली होती. १० ऑक्टोबर रोजी सीजेपीने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत CAPF ची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली होती.
दिल्ली पोलिसांच्या विनंतीनंतर गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या एकूण ३०१ कंपन्यांच्या तैनातीला मंजुरी दिली आहे. ६ ऑक्टोबर रोजी २२१ कंपन्या आणि ८ ऑक्टोबर रोजी ८० कंपन्या तैनात करण्याची विनंती करण्यात आली होती. सीजेपी आणि इतर संघटनांकडून होणाऱ्या संभाव्य विरोधाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अतिरिक्त तैनातीला मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक जंतर मंतर, निवडणूक आयोग, संसद भवन आणि इंडिया गेट यांसारख्या ठिकाणी पुन्हा निदर्शने करण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहे. गृह मंत्रालयाला पाठवलेल्या एका पत्रात मंत्र्यांच्या कार्यालयांबाहेर आणि निवासस्थानांबाहेर होणाऱ्या आंदोलनांबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तैनाती वाढवण्याची विनंती दिल्ली पोलिसांनी केली आहे.
