अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीला अक्षरधाम मंदिराच्या नक्षीकामाची भुरळ, कुटुंबासह घेतलं स्वामीनारायण मंदिरात दर्शन
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी चार दिवसांच्या भारत दौऱ्यात आज अक्षरधाम मंदिरास भेट दिली. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी मंदिराच्या शानदार कलाकृती आणि वास्तुकलेचे कौतुक केले. वेन्स यांनी मंदिरातील सद्भाव आणि कौटुंबिक मूल्यांच्या संदेशाचे कौतुक केले आणि गेस्टबुकमध्ये त्यांनी आपले अनुभव लिहिले.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांना अक्षरधाम मंदिराच्या नक्षीकामाची भुरळ पडली आहे. जेडी वेन्स हे चार दिवसाच्या भारत दौओऱ्यावर आले आहेत. आज सकाळी ते नवी दिल्लीत पोहोचले. त्यानंतर कुटुंबासह त्यांनी अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. अक्षरधाम मंदिराच्या दर्शनावेळी वेन्स आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. यावेळी त्यांच्या मुलांनी भारतीय वेष परिधान केला होता. जेडी वेन्स यांची पत्नी उषा या भारतीय वंशाच्या आहेत.
यावेळी वेन्स कुटुंबीय मंदिराची शानदार कला आणि वास्तुकला पाहून खूश झाले. त्यांनी अक्षरधाम परिसरात लिहिलेल्या सद्भाव, कौटुंबिक मूल्य आणि शाश्वत ज्ञानाच्या संदेशाचं कौतुक केलं. गेस्ट बुकमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी आपले अनुभव शेअर केले.
या अत्यंत सुंदर ठिकाणी माझं आणि माझ्या कुटुंबाचं स्वागत केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे. अचूक आणि सौंदर्याने नटलेलं सुंदर मंदिर बनवल्याबद्दल भारताचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. माझ्या मुलांना हे मंदिर खूपच आवडलं. देव सर्वांचं भलं करो, असं वेन्स यांनी लिहिलंय.
मोदींसोबत बैठक
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ पॉलिसी आणून जगभरातील अर्थव्यवस्थांना दणका दिलेला असतानाच अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचं भारतात आगमन झालं आहे. या दौऱ्यात जेडी वेन्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी अर्थव्यवस्था, व्यापार आणि भू राजकीय संबंधांवर दोन्ही नेते चर्चा करतील.
Delhi: Vice President of the United States, JD Vance, Second Lady Usha Vance, along with their children, visited Akshardham Temple.
(Source: Akshardham Temple) pic.twitter.com/eQrvqWpol5
— ANI (@ANI) April 21, 2025
दुसऱ्या अधिकाऱ्याचा दौरा
उपराष्ट्रपती वेन्स या कार्यकाळात भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प प्रशासनातील दुसरे वरिष्ठ अधिकारी आहेत. या आधी अमेरिकेची गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड भारतात आली होती. त्या मार्चमध्ये भारतात आल्या होत्या. आता मोदी आणि वेन्स यांच्या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. वेन्स या दौऱ्या आग्र्यातील ताजमहल पाहणार आहेत. त्याशिवाय जयपूरलाही जाणार आहेत. तिथून ते पुढे अमेरिकेत जाणार आहेत.
अक्षरधाम मंदिराचे प्रवक्ते काय म्हणाले?
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर अक्षरधाम मंदिराच्या प्रवक्ता राधिका शुक्ला यांचं निवेदन आलं आहे. आम्ही वेन्स यांना अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती भेट दिली आहे. त्यांना कायम मंदिराचं स्मरण राहावं यासाठी ही प्रतिकृती दिली आहे. मंदिराचं दर्शन करत असताना त्यांना मंदिराची कलाकृती, येथील संदेश आणि सांस्कृतिक ठेवण प्रचंड आवडली. त्यांनी मुलांसोबत या ठिकाणी आनंद लुटला. त्यांनी आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरेचा अनुभव घेतला आहे. ते अत्यंत आनंदी होते, असं शुक्ला म्हणाल्या.
