भाजपला मोठं खिंडार? टाटा बाय बाय… मोदींचा फोटो हटवला, बडा नेता पक्ष सोडणार? निवडणुकीपूर्वीच मोठा गेम
उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठे खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो हटवत पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत, ते समाजवादी पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचे कुटुंबही नाराज आहे. या राजकीय घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सामाजिक समीकरणाला धक्का बसू शकतो, असा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी येत्या 16 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीला अवघे 9 दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीच भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे. भाजपचे नेते, माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. कश्यप यांनी एक पोस्ट शेअर करून तसे संकेतच दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये आता उलटी गंगा सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे.
उत्तर प्रदेशात भाजप ज्या सामाजिक समीकरणातून निवडणुका जिंकत होतो, त्याला 2024च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने सुरूंग लावला आहे. हीच रणनीती समाजवादी पार्टी 2027च्या निवडणुकीत अवलंबण्याच्या तयारीत आहे. तर, दुसरीकडे गैर यादव ओबीसी आणि गैर जाटव दलित समीकरणावर भाजपने फोकस ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिकीट वाटप करताना राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर, ओबीसी 3, दलित 2, ब्राह्मण 2 आणि एक ठाकूर समुदायाचे उमेदवार भाजपने राज्यसभेत उतरवले आहेत. मात्र, भाजपची हीच खेळी भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. भाजपच्या सोशल इंजीनिअरिंगला तडे जाण्याची शक्यता आहे.
भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पक्षात एकच असंतोष निर्माण झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या कुटुंबाची नाराजी आणि माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांचा टाटा बाय बाय वाली सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ उडाली आहे. यामुळे पासी आणि कश्यप व्होटबँक गडबड करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
धर्मेंद्र कश्यप सपात जाणार?
धर्मेंद्र कश्यप हे उत्तर प्रदेशातील भाजपचे मोठे नेते आहेत. ओबीसींचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. रुहेलखंडमध्ये त्यांचा दबदबा आहे. आंवला लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडून आलेले आहेत. त्यांच्या आजच्या पोस्टने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर ‘टाटा बाय-बाय’ लिहिलं आणि मध्यरात्री सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही हटवला आहे. त्यामुळे कश्यप हे आता पक्ष सोडणार असल्याचं जवळ जवळ स्पष्ट झालं आहे.
धर्मेंद्र कश्यप प्रचंड अस्वस्थ आहेत. पक्षाने राज्यसभेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपल्याकडे पक्षाने दुर्लक्ष केलं. हा आपल्यावरील अन्याय आहे, असं कश्यप यांना वाटत आहे. विशेष म्हणजे कश्यप हे पूर्वी समाजवादी पार्टीतच होते. आता त्यांची पुन्हा घरवापसी होताना दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र कश्यप यांनी भाजप सोडण्याची तयारी सुरू केली आहे. 18 ऑक्टोबर रोजी ते समजावादी पार्टीत जाऊ शकतात. त्याची पूर्ण तयारी त्यांनी केली आहे. समाजवादी पार्टीत जाण्याची स्क्रिप्टही तयार आहे. त्यानंतरच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून मोदींचा फोटोही हटवला आहे.
कौशल किशोरही नाराज
अवधमधील प्रमुख दलित नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कौशल किशोर हे सुद्धा पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत. राज्यसभेचं तिकीट न दिल्याने त्यांच्या कुटुंबाने रोष व्यक्त केला आहे. कौशल यांचे चिरंजीव हे भाजपचे अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी एक पोस्ट केली असून आपल्या आईवडिलांचा जिथे सन्मान होत नाही, तिथे राहण्यात काही अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
कश्यप हे समाजवादी पार्टीत जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. पण कौशल किशोर यांचं कुटुंब कुठे जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौशल किशोर यांच्या कुटुंबीयांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असली तरी पुढची दिशा मात्र स्पष्ट केली आहे. मात्र, सपा नेतृत्व कौशल किशोर यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.
