AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषद बरखास्त करता येते का? देशात किती राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात?

वायएसआर काँग्रेसने तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना धक्का देत, थेट आंध्र प्रदेशची विधानपरिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

विधानपरिषद बरखास्त करता येते का? देशात किती राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात?
| Updated on: Jan 27, 2020 | 12:25 PM
Share

मुंबई : आंध्र प्रदेशातील जगन मोहन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्राची विधान परिषदच रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. विधानसभेच्या विशेष अधिवेशनापूर्वी जगन मोहन सरकारच्या मंत्रिमंडळाने हा मोठा निर्णय घेतला. मात्र अशाप्रकारे विधानपरिषद बरखास्त करता येते का? त्याचे नियम काय? देशात किती राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यासंबंधी हा स्पेशल रिपोर्ट. (Vidhan Parishad Abolishment Rules)

आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना तीन राजधान्या अस्तित्त्वात आणायच्या आहेत, मात्र त्याबाबतचं विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडलं आहे. त्यामुळेच वायएसआर काँग्रेसने तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना धक्का देत, थेट विधानपरिषद बरखास्तीचा निर्णय घेतला.

विधान परिषद बरखास्तीचा निर्णय का?

आंध्र प्रदेश विधान परिषदेत 58 सदस्य संख्या आहे. राज्यात भलेही विधानसभेला जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं असलं, तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाचा दबदबा आहे. परिषदेत वायएसआर काँग्रेसचे केवळ 9, तर टीडीपीचे 27 आमदार आहेत. त्यामुळे कोणतेही विधेयक विधानसभेत मंजूर केलं, तरी चंद्रबाबू नायडूंचा पक्ष सरकारचे निर्णय विधानपरिषदेत हाणून पाडतो.

महाराष्ट्र विधान परिषदेची स्थिती काय?

महाराष्ट्र विधानपरिषदेचं संख्याबळ 78 इतकं आहे. यापैकी 30 सदस्य विधानसभेच्या सदस्यांनी ( विधानसभा आमदार) निवडून द्यायचे असतात. सात सदस्य हे मुंबई, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण, नागपूर आणि पुणे या प्रत्येक प्रशासकीय विभागातून निवडून यावे लागतात. तर याच विभागांतून सात शिक्षक आमदार विधानपरिषदेवर निवडून येतात.

विधानपरिषदेचे 22 सदस्य हे 21 वेगवेगळ्या प्रदेशातून निवडले जातात. अहमदनगर, अकोला-वाशिम-बुलडाणा, अमरावती, औरंगाबाद-जालना, भंडारा-गोंदिया, धुळे-नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली-सातारा, सोलापूर, ठाणे-पालघर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि यवतमाळ यातून प्रत्येकी एक, तर मुंबईतून दोन सदस्य निवडून येतात.

कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील 12 राज्यपाल नियुक्त सदस्य विधानपरिषदेवर निवडून येतात. सध्या भाजपचे 22, राष्ट्रवादीचे 15, काँग्रेसचे 13, शिवसेनेचे 12, तर 10 अपक्ष आमदार विधानपरिषदेवर आहेत. तर सहा जागा रिक्त आहेत.

विधान परिषद बरखास्त करता येते का?

विधान परिषद अस्तित्वात आणण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच विधान परिषद रद्द करता येते. विधानसभेतील दोनतृतीयांश सदस्यांनी तसा ठराव केल्यावर संसदेची मान्यता लागते. याआधीही आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद बरखास्त करण्यात आली होती. पण काँग्रेस सरकारने ती पुन्हा कार्यान्वित केली होती.

आसाममध्ये विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा ठराव 2005 आणि 2010 मध्ये दोनदा करण्यात आला होता. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली होती, पण पुढे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

विधान परिषद कशी अस्तित्वात येते?

विधानसभेने ठराव मांडल्यानंतर मतदानात भाग घेतलेल्या सभागृहातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांचा त्याला पाठिंबा लागतो. त्यानंतर संसदेची मान्यता आवश्यक असते. संसदेने मंजुरी दिल्यावरच विधान परिषद अस्तित्वात येऊ शकते.

देशात कोणत्या राज्यांमध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे?

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांमध्ये आतापर्यंत विधान परिषद कार्यरत होती. मात्र ही संख्या आता एकने कमी झालेली आहे.

जम्मू आणि काश्मीरची विधानपरिषद नुकतीच बरखास्त झाली आहे. आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांना बरखास्त झालेली विधानपरिषद पुन्हा अस्तित्वात आणायची आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांना विधानपरिषद हवी आहे.

विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते?

विधान परिषदेची सदस्य संख्या 40 पेक्षा कमी नसावी तसेच राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एकतृतीयांश सदस्यांपेक्षा जास्त नसावी, अशी घटनेत तरतूद आहे.

Vidhan Parishad Abolishment Rules

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.