
नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. तीन दिवस ही कॉन्क्लेव्ह चालणार आहे. आज या कॉन्क्लेव्हचा पहिला दिवस होता. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अभिनेत्री रवीना टंडन, जी-20चे भारताचे शेरपा अमिताभ कांत, अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूरसहीत अनेक प्रसिद्ध मान्यवरांनी आज वेगवेगळ्या सत्रातील परिसंवादात भाग घेतला आणि आपले विचार मांडले. यावेळी काही मान्यवरांना नक्षत्र सन्मान देऊन गौरवण्यात आलं.
आजच्या समीटची सुरुवात टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी बरूण दास यांनी भारताच्या साहसिक दृष्टिकोणावर भाष्य केलं. भारताला आर्थिक किंवा सैन्य शक्तीची गरज नसून सॉफ्ट पॉवरची गरज आहे. भारत वैश्विक स्तरावर पुढे जात आहे. वैश्विक स्तरावरील उच्च तालिकेत भारत आपलं स्थान निर्माण करत आहे, असं बरूण दास यांनी सांगितलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची मुलाखत पार पडली.
what india thinks today
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची यावेळी मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित योजनांवर भाष्य केलं. खेलो इंडिया समेत अनेक योजना भारत सरकारने राबवल्या आहेत. खेळाडूंना विविध सुविधा दिल्या जात आहेत. त्याचा रिझल्टही खेळाडूंकडून मिळत आहे. भारताने आशियाई स्पर्धेत 100 पदके मिळवली. हे देशात पहिल्यांदाच घडलं. यापूर्वी अशी कामगिरी झाली नव्हती. खरे तर भारताने जे कर्म केलं, त्याची फळ आता आपण चाखत आहोत, असं अनुराग ठाकूर म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्ला चडवला. काँग्रेस नेत्यांवरच नाही तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. दोन्ही मायलेकं जामिनावर बाहेर आहेत. एवढेच नव्हे तर कधीकाळी प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट देणारे अरविंद केजरीवाल हे ईडीचे सात समन्स आल्यानंतरही ईडीकडे जात नाहीत. त्यांचे मंत्री, आमदार भ्रष्टाचारी निघाले आहेत. हेच केजरीवाल कधीकाळी भ्रष्टाचाराविरोधातील लढा लढत होते, असा टोला त्यांनी लगावला.
union Minister Anurag Thakur
त्यानंतर स्पोर्ट्स बर्निशिंग- अॅन अपॉर्च्युनिटी फॉर न्यू इंडिया या सत्राची सुरुवात झाली. यावेळी भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि नॅशनल कोच पुलेला गोपिचंद यांनीही भूमिका मांडली. भारतीय खेळांसाठी मागची दहा वर्ष अत्यंत चांगली होती. यापूर्वी कधीच कोणत्या पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रावर एवढं भाष्य केलं नव्हतं. खेलो इंडियासारख्या इव्हेंटने देशातील मुलं आणि पालकांना क्रीडा जगतातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी दरवाजे उघडले आहेत. मुलं अभ्यास सोडून खेळावर लक्ष देत आहेत. त्याचीच चिंता अधिक आहे. कारण क्रीडा क्षेत्रातील संधी मर्यादित आहेत, असं पुलेला गोपिचंद म्हणाले.
यावेळी कोलाज स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या सीईओ लतिका खनेजा यांनीही मत मांडलं. क्रिकेट सातत्याने पुढारला आहे. क्रिकेटने अनेक खेळाडू आणि इतर लोकांना संधी दिली आहे. त्यामुळे इतर खेळांना प्रोत्साहीत करताना क्रिकेटवर टीका करणं योग्य नाही, असं लतिका खनेजा म्हणाल्या. यावेळी बुंदेसलिगाचे सीईओ पीटर नोबर्ट, एफके ऑस्ट्रिया व्हिएन्नाचे माजी सीईओ मार्कस क्रेशमर, सीव्हीबायू टाटा मोटर्सचे सीएमओ शुभ्रांशू सिंह आणि बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट आणि मार्केटिंग व्हेटेरिअन लॉयड मॅथियास यांनीही विचार मांडले.
त्यानंतर ब्रांड इंडिया : लिव्हर एजिंग सॉफ्ट पॉवर या विषयावर परिसंवाद रंगला. यावेळी नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी विचार मांडले. जी20 सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर मिश्रण आहे. जी 20 शिखर संमेलनात सर्व देशांसोबत काम करण्याच्या आणि सर्वसाधारण संमती बनवण्याच्या भारताच्या क्षमतेचं प्रदर्शन करण्यात आलं. पर्यटनातून भारतात सर्वाधिक रोजगार निर्माण केले जाऊ शकतात. भारत येत्या पाच वर्षात ट्रॅव्हल आणि टुरिज्ममधून 25 मिलियनहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या जाऊ शकतात, असं अमिताभ कांत म्हणाले.
अभिनेत्री रवीना टंडन हिने फिमेल प्रोटागोनिस्ट : द न्यू हिरो या विषयावर आपलं मत मांडलं. यावेळी तिला नेपोटिज्मबाबत विचारण्यात आलं. त्यावर नेपो किड्सवर बोललो तर आपले अर्धे राजकीय क्षेत्र आणि अर्धे मनोरंजन क्षेत्र संपुष्टात येईल, असं तिने सांगितलं. एकदा मला सलमान खान सोबत काम करण्याची ऑफर आली. त्यावेळी मी मित्रांना विचारलं. त्यावर त्यांनी मला नकार देऊ नको म्हणून सांगितलं. कारण त्यांना सलमान खानला भेटायचं होतं. अशा पद्धतीने माझ्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली, असं रवीना म्हणाली.
अभिनेत्री आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनीही आपलं मत मांडलं. माझ्या वडिलांकडून आईला दिली जाणारी वागणूक पाहिली. आईची परिस्थिती पाहिली आणि तेव्हाच ठरवलं की आपल्याला अबला नाही बनायचं नाही. मी अबला नारी बनू नये असं माझ्या आईलाही वाटत होतं. मी हांजी हांजी करत नवऱ्याच्या पुढे पुढे करू नये असं तिचं मत होतं, असं खुसबू सुंदर म्हणाल्या. तसेच अॅनिमल सारखा सिनेमा हिट होतो याचं आश्चर्य वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Kushboo Sundar
कार्यक्रमाच्या शेवटी बाऊंडलेस भारत : बियॉन्ड बॉलिवूड या विषयावर प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शन शेखर कपूर यांनी परखड मते मांडली. यावेळी ग्रॅमी अॅवार्ड विजेते बासरी वादक राकेश चौरसिया, सिनेमाटोग्राफर ख्रिस्तोफर रिप्ले, ग्रॅमी अॅवार्ड विजेते संगीतकार रिकी केज आणि व्ही. सेल्वागणेशन यांनीही आपलं म्हणणं मांडलं. शेखर कपूर यांनी आजच्या काळातील एआयची ताकद किती महत्त्वाची आहे हे विशद केलं.
समीटच्या पहिल्याच दिवशी आठ प्रसिद्ध व्यक्तींना नक्षत्र सन्मान देऊन गौरवण्यात आलं. अभिनेत्री रवीना टंडन, बॅडमिंटन चॅम्पियन अनमोल खरब, क्रिकेटर आमिर हुसैन लोन, ग्रॅमी अॅवार्ड विजेते बासरी वादक राकेश चौरसिया, अॅथलिट हरमिलन बँस, शुटर सिक्त कौर समरा, ग्रॅमी विजेते संगीतकार व्ही. सेल्वागणेशन आणि अल्लू अर्जुन यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.