WITT 2024 : सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘नक्षत्र सन्मान’; काय म्हणाला, अल्लू अर्जुन?
टीव्ही9 नेटवर्कने राजधानी दिल्लीत मेगा इव्हेंट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडा जगतातील दिग्गज, उद्योग जगतातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील नामवंत सामील झाले होते.

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिआ थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुष्पा या सिनेमाने साऊथच नाही तर संपूर्ण भारतात धुमाकूळ घालणारा प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन या कार्यक्रमाला येऊ शकला नाही. मात्र, अल्लू अर्जुनने व्हिडीओद्वारे एक संदेश पाठवून टीव्ही9 नेटवर्कचे आभार मानले आहेत.
अल्लू अर्जुन सध्या पुष्पा : द रुल या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला गेला होता. त्यामुळे त्याच्या या सिनेमाची शुटिंग थांबली होती. आता त्याने पुन्हा शुटिंग सुरू केली आहे. त्यामुळेच अल्लू अर्जुन कार्यक्रमाला येऊ शकला नाही. पण एका व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून त्याने टीव्ही9 नेटवर्कचे आभार मानले. तसेच कार्यक्रमाला येऊ न शकल्याबद्दल खेदही व्यक्त केला.
पुरस्कार चाहत्यांना समर्पित
सध्या मी पुष्पा-2च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. पण माझा हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांना समर्पित करत आहे. चाहत्यांचा पाठिंबा आणि प्रेम याशिवाय हे यश आणि पुरस्कार मिळणं शक्यच नव्हतं, असं अल्लू अर्जुननं म्हटलं आहे.
अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. भाषांच्या सीमाही या सिनेमाने मोडल्या होत्या. आता या सिनेमाचा दुसरा पार्ट येत आहे. या सिनेमाची शुटिंग अजूनही पूर्ण झालेली नाही. हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या युनिट काम करत आहे. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला गेल्यावर अल्लू अर्जुनने पुष्पाचा तिसरा पार्ट येणार असल्याची हिंटही दिली होती. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या सिनेमाची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अल्लू अर्जुनने त्याच्या करिअरची सुरुवात 2003मध्ये केली होती. गंगोत्री हा त्याचा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा चांगला चालला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच चालला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. तेव्हापासून त्याने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. केवळ साऊथ किंवा हिंदी बेल्टमध्येच नव्हे तर जगातही त्याचे चाहते आहेत.
