Balidan Badge : मेजर ऋषभ संब्याल यांच्या छातीवर नेहमी दिसायचे ‘बलिदान बॅज’; मिळवायला कमांडोंना द्यावी लागते कठीण परीक्षा!
What is Balidan Badge : राष्ट्रपतींच्या विशेष सहाय्यक पदाचा राजीनामा दिल्यानंतर मेजर ऋषभ सिंग संब्याल यांच्या छातीवर दिसणाऱ्या ‘बलिदान बॅज’ची चर्चा सुरू झाली आहे. ही बॅज भारतीय लष्कराच्या विशेष दलातील निवडक अधिकारी आणि सैनिकांना मिळते. नुकत्याच मेजर दीक्षा सी. मुदादवेनन्नवर यांनाही हा सन्मान मिळाला असून, त्या हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. पण ही बॅज मिळवण्यासाठी कमांडोंना नेमक्या कोणत्या खडतर परीक्षा द्याव्या लागतात?

राष्ट्रपतींच्या विशेष सहाय्यक पदाचा राजीनामा दिलेल्या मेजर ऋषभ सिंग संब्याल यांच्या छातीवर एक खास बॅज नेहमी दिसायची, ती म्हणजे ‘बलिदान बॅज’. भारताचे राष्ट्रपतीपद हे सर्वात मानाचे पद असल्यामुळे त्या पदावरील व्यक्तीची सुरक्षा ही सरकारसमोरील सर्वोच्च गोष्ट असते. त्यासाठी सर्वात विश्वासू असे विशेष सहाय्यक (ADC) पद निर्माण करण्यात आले आहे. या पदावर कार्यरत असलेले मेजर ऋषभ सिंग संब्याल यांनी नुकताच राजीनामा दिला असून, ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात व राष्ट्रपती भवन परिसरात सावलीसारखे वावरताना दिसत असत. त्यांच्या राजीनाम्यानंतर हे ADC पद आणि त्यांच्या छातीवर शोभणारी ‘बलिदान बॅज’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दरम्यान, नुकतेच भारतीय लष्कराच्या मेजर दीक्षा सी. मुदादवेनन्नवर यांनाही स्पेशल फोर्सेसच्या या प्रतिष्ठित बलिदान बॅजने सन्मानित करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. ही काही साधीसुधी बॅज नसून देशसेवा करताना दाखवलेले शौर्य, समर्पण आणि सर्वोच्च त्यागाचे एक मोठे प्रतीक आहे. भारतीय सैन्यात सेवा देण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी ही ‘बलिदान बॅज’ नेमकी काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
बलिदान बॅज म्हणजे नेमकी काय?
भारतीय लष्कराकडून मिळणारी बलिदान बॅज केवळ पॅराशूट रेजिमेंटच्या विशेष दलात (पॅरा एसएफ) कार्यरत असणाऱ्या निवडक सैनिकांना आणि अधिकाऱ्यांनाच दिली जाते. ही बॅज परिधान करणाऱ्या सैनिकांना लष्करात अभिजात दर्जा दिला जातो. या बॅजच्या रचनेमागे मोठा इतिहास आणि अर्थ दडलेला आहे. बॅजच्या अगदी वरच्या बाजूला एक पॅराशूट आहे, जे विशेष दलाचे प्रतिनिधित्व करते. त्याच्या खाली एक धारदार कमांडो खंजीर असून, त्या खंजीराच्या पात्यातून दोन्ही बाजूला पंख बाहेरच्या दिशेने गेलेले दिसतात. या खंजीरावर देवनागरी लिपीमध्ये ‘बलिदान’ हा शब्द स्पष्टपणे कोरलेला दिसून येतो.
हा सन्मान कधी अन् कोणाला मिळतो?
ही बॅज मिळवणे अजिबात सोपे नाही. पॅराशूट रेजिमेंटला दिल्या जाणाऱ्या अत्यंत खडतर, शारीरिक आणि मानसिक परीक्षेचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कमांडोंनाच हा सन्मान मिळतो. यामध्ये सैनिकांना भूक, थकवा आणि प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. मानसिक कणखरतेची परिसीमा पार होते. तीन महिन्यांच्या या सर्व परीक्षेच्या काळात कमांडोंना थेट विमानातून पाच यशस्वी उड्या माराव्या लागतात, ज्यामधील एक उडी तर अंधारातही घ्यावी लागते.
ग्लासाची कडा चावून गिळावी लागते
बलिदान बॅज प्रदान करण्याची पद्धत अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारी आहे. खडतर परीक्षा पार पडल्यानंतर कमांडोला सर्वप्रथम स्पेशल फोर्सेसची टोपी दिली जाते. यानंतर एका खास परंपरेनुसार कमांडोला रमने भरलेला ग्लास दिला जातो. रम प्राशन केल्यानंतर सैनिकाला त्या काचेच्या ग्लासाची कडा आपल्या दातांनी चावून ती गिळावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सैनिकाच्या छातीवर उजव्या बाजूला, हृदयाजवळ ही बलिदान बॅज लावली जाते.
