
रेल्वे ही भारतातील प्रवाशांची लाईफलाईन आहे, असं म्हटलं तर ती अतिश्योक्ती होणार नाही, दर दिवशी लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. जगातील सर्वात मोठं रेल्वेचं नेटवर्क हे भारतामध्ये आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आजही लाखो लोक फक्त ट्रेनच्या प्रवासालाच प्राधान्य देतात. कारण त्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. एक तर तुमचा कमी खर्चात प्रवास होतो, तसेच आरामदायी प्रवास होतो. लांबंच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे ही बसपेक्षा अधिक आरामदायी असते, तसेच तिचं तिकीट देखील कमी असतं. दुसरीकडे विमानाचा प्रवास हा ट्रेनपेक्षा अधिक जलद आणि आरामदायी असू शकतो, मात्र तिकीट प्रचंड असतं. रेल्वेमध्ये श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत असे समाजातील सर्वच वर्गातील लोक प्रवास करत असतात. त्यामुळे रेल्वेमध्ये अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात.
अशीच एक घटना रेल्वेच्या झासी डिव्हिजनमधून समोर आली आहे. एका ट्रेनमध्ये टीसीकडून चेकिंग सुरू होती. तेव्हा रेल्वेच्या एका सीटवर बसलेल्या वृद्धाकडे टीसीने तिकिटाची मागणी केली, टीसीने तिकिटाची मागणी करताच या वृद्ध व्यक्तीने आपल्या हातातील कागद त्या टीसीला दाखवला. तो कागद दाखवताच टीसीने या वृद्धाला नमस्कार केला. मात्र त्यानंतर पुढील कारवाई केली.
हा वृद्ध एक समाजसेवक होता, आणि तो कागद त्याच्या कामाशी संबंधित होता, टीसीने जेव्हा हा कागद पाहिला तेव्हा टीसीने त्या वृद्धाला नमस्कार केला, आणि म्हणाला तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. जर तुमच्या कामासाठी काही मदत हवी असेल तर मी ती माझ्या पैशांमधून करायला तयार आहे. मात्र तुम्ही अशा प्रकारे ट्रेनमधून फ्री मध्ये प्रवास करू शकत नाही, तुम्हाला तिकीट घ्यावंच लागेल. तेव्हा त्या वृद्धाने देखील फार विरोध न करता लगेच तिकीट घेतलं. हा प्रसंग ज्या प्रवाशांनी पाहिला, ही घटना ज्या लोकांनी अनुभवली, त्या सर्वांकडून टीसीच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करण्यात आलं.